Oxygens: काय सांगता! श्वास घेण्यास त्रास होताच ऑक्सिजनसाठी रुग्ण थेट पिंपळाच्या झाडाखाली जाऊन झोपले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 03:43 PM2021-05-01T15:43:22+5:302021-05-01T15:45:54+5:30
या लोकांना पिंपळाच्या झाडाखाली बसून आराम मिळाला की नाही हे माहिती नाही परंतु रुग्णांना पिंपळाच्या झाडाखाली झोपलेले पाहून इतरांनीही त्याठिकाणी गर्दी केली.
शाहजहांपूर – देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बेड्स आणि ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहेत. कोरोना महामारीमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शाहजहांपूरच्या तिलहर याठिकाणी अजब गजब प्रकार समोर आला आहे. येथे ४-५ लोकांना श्वास घेण्यास अडचण होऊ लागली तेव्हा ते ऑक्सिजन सिलेंडर शोधण्याचा प्रयत्न केला पण कुठेही ऑक्सिजन मिळाला नाही.
त्यानंतर या लोकांना कोणीतरी सांगितलं की, पिंपळाचं झाड २४ तास ऑक्सिजन देतं. त्यानंतर हे ५ रुग्ण तिलहर परिसरातील रोडवर असलेल्या एका पिंपळाच्या झाडाखाली जाऊन झोपले. या लोकांना पिंपळाच्या झाडाखाली बसून आराम मिळाला की नाही हे माहिती नाही परंतु रुग्णांना पिंपळाच्या झाडाखाली झोपलेले पाहून इतरांनीही त्याठिकाणी गर्दी केली. तिलहरच्या मोहल्ला बहादुरगंज येथील अनेक कुटुंब गेल्या ३ दिवसांपासून फतेहगंजच्या रस्त्याच्या किनारी पिंपळाच्या झाडाखाली दिवसरात्र विश्रांती घेत आहेत.
या सर्वांची अवस्था खूप खराब होती. या सगळ्यांची अँटिजेन चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. परंतु संक्रमणाचे लक्षण या लोकांमध्ये दिसून येत आहे. हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट निगेटिव्ह असल्यानं त्यांना दाखल करण्यासाठी नकार देत घरी पाठवलं. घरात अवस्था बिकट झाली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर ऑक्सिजन सिलेंडरची शोधाशोध सुरू झाली. पण कुठेही ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध झाला नाही.
याचवेळी काहींनी या लोकांना पिंपळाच्या झाडाखाली पडून राहा, भरपूर ऑक्सिजन मिळेल असं सांगितलं. त्यानंतर ३ दिवसांपासून ५ लोक याठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली झोपले होते. त्यानंतर या लोकांना विचारला असता त्यांनी घरात श्वास घेण्यास त्रास होतोय पण पिंपळाच्या झाडाखाली येऊन आराम मिळतोय असं सांगितले. या प्रकाराची माहिती मिळताच तिलहरचे आमदार रोशनलाल हेदेखील झाडाखाली झोपलेल्या रुग्णांना बघण्यासाठी तिथे पोहचले. त्यानंतर आमदार रोशनलाल यांनी या सर्वांना डॉक्टरांची सुविधा मिळण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.