पी चिदंबरम 106 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर आले; उद्या पत्रकार परिषद घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 10:02 PM2019-12-04T22:02:41+5:302019-12-04T22:03:22+5:30
आयएनएक्स मीडिया ही पीटर व इंद्राणी मुखर्जी यांची कंपनी असून ती टीव्ही चॅनल्सचे संचालन करण्यासाठी २००६ मध्ये स्थापन करण्यात आली होती.
नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांनी चौकशीला सहकार्य करावं आणि देश सोडून जाऊ नये या दोन अटी त्यांना घालण्यात आल्या आहेत. यानंतर आज रात्री चिदंबरम हे तुरुंगातून बाहेर आले असून त्यांचे पूत्र कार्ती चिदंबरम हे त्यांना घेण्यासाठी आले होते.
पी. चिदंबरम 17 ऑक्टोबरपासून ईडी कोठडीत होते. मागील 106 दिवसांपासून चिदंबरम तिहारमधील तुरुंगात होते. तसेच त्यांनी याआधी दिल्ली हायकोर्टाकडून नाकारण्यात आलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेत निर्णयाला आव्हान दिलं होतं. मात्र, सुप्रीम कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआय तपास करीत आहे. सीबीआयसोबत ईडीकडूनदेखील या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
P Chidambaram, Congress: I will address a press conference tomorrow. I am happy that I stepped out and breathing the air of freedom after 106 days. pic.twitter.com/1zAf0OJERl
— ANI (@ANI) December 4, 2019
तुरुंगातून बाहेर आल्यावर चिदंबरम यांनी स्वातंत्र्याच्या हवेत श्वास घेत असल्याचे सांगत उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याचे म्हटले आहे. चिदंबरम यांच्या सुटकेवेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
Delhi: Congress leader P Chidambaram and his son Karti Chidambaram arrive at the residence of party's Interim president Sonia Gandhi. Supreme Court today granted bail to P Chidambaram in the INX Media money laundering case registered by the Enforcement Directorate. pic.twitter.com/5oozp4eMKb
— ANI (@ANI) December 4, 2019
आयएनएक्स मीडिया ही पीटर व इंद्राणी मुखर्जी यांची कंपनी असून ती टीव्ही चॅनल्सचे संचालन करण्यासाठी २००६ मध्ये स्थापन करण्यात आली होती. या कंपनीने २००७ मध्ये मॉरिशसच्या तीन कंपन्यांकडून विदेशी भांडवल उभारण्यासाठी फॉरेन एक्स्चेंज प्रमोशन बोर्डाला परवानगी मागितली. तसेच आयएनएक्स न्यूज या सहयोगी कंपनीलाही विदेशी भांडवलाची परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती.
दोनच महिन्यांत एफआयपीबीने आयएनएक्स मीडियाला ४.६२ कोटी विदेशी भांडवल आणण्याची परवानगी दिली. परंतु आयएनएक्स न्यूजचा अर्ज नामंजूर केला. या परवानगीचा दुरुपयोग करून, आयएनएक्स मीडियाने ४.६२ कोटींऐवजी ३०५ कोटी रुपयांचे भांडवल मॉरिशसमधून आयएनएक्स व आयएनएक्स न्यूज या कंपन्यांमध्ये आणले. यासाठी आयएनएक्सने ऑगस्ट २००७ ते मे २००८ या काळात आपला १० रुपयांचा शेअर ८१० रुपयांना मॉरिशसच्या कंपन्यांना विकला, असे प्राप्तिकर खात्याच्या चौकशीत समोर आले आहे.