पी. चिदम्बरम अखेर १0६ दिवसांनी तुरुंगातून बाहेर, सुप्रीम कोर्टाचा जामीन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 06:01 AM2019-12-05T06:01:52+5:302019-12-05T06:05:02+5:30
तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.
नवी दिल्ली : ‘मनी लॉड्रिंग’च्या आरोपाखाली अटक केलेले माजी वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. त्यामुळे १०६ दिवस तुरुंगात असलेले चिदम्बरम रात्री बाहेर आले. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. ते गुरुवारी संसदेत जाणार आहेत.
त्यांची तिहार कारागृहातून सुटका झाली, तेव्हा काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी बाहेर उभे होते. ते बाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांचा जयजयकार केला.
या आधी दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. त्याविरुद्ध केलेले अपील मंजूर करून न्या.आर. भानुमती, न्या. ए.एस. बोपण्णा व न्या. ऋषिकेष रॉय यांच्या खंडपीठाने दोन लाख रुपयांच्या जामिनावर चिदम्बरम यांच्या सुटकेचा आदेश दिला. तो देताना त्यांचा पासपोर्ट सीबीआयकडे जमा राहील, लेखी पूर्वानुमती न घेता त्यांना देशाबाहेर जाता येणार नाही. गरज असेल तेव्हा तपासासाठी जावे लागेल. तपासात ढवळाढवळ करता येणार नाही व साक्षीदारांवर प्रभाव टाकता येणार नाही, प्रसिद्धी माध्यमांशी बोलता येणार नाही, या अटी घातल्या आहेत.
त्यांचा जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आर्थिक गुन्हे गंभीर स्वरूपाचे असतात हे मान्य केले तरी आरोपीला जामीनच देऊ नये, अशी तरतूद नाही. ईडीला चौकशीसाठी चिदम्बरम यांची ४५ दिवसांहून अधिक काळ कोठडी मिळाली होती. राहिलेला तपास त्यांना बोलावूनही पूर्ण करता येईल. जामिनाच्या वेळी न्यायालयाने आरोपी दोषी आहे की नाही हे ठरवायचे नसते, याचे स्मरणही खंडपीठाने दिल्ली उच्च न्यायालयाला करून दिले.
पोटदुखीने आजारी
सीबीआयने २१ आॅगस्ट रोजी चिदम्बरम यांना दिल्लीतील घरातून अटक केली होती. त्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर ईडीने १६ आॅक्टोबर रोजी अटक केली.
विशेष न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन नाकारल्याने या दोन्ही प्रकरणांत ७४ वर्षांच्या चिदम्बरम यांना १०६ दिवस कोठडीत राहावे लागले. त्या काळात त्यांना पोटदुखीने दोनदा आजारपणही आले.