Farm laws Repeal: “लोकशाही मार्गाने आंदोलन करुन साध्य करता आलं नाही ते निवडणुकीच्या भीतीने झालं”: पी. चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 01:07 PM2021-11-19T13:07:12+5:302021-11-19T13:09:12+5:30

Farm laws Repeal: केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे.

p chidambaram says farm laws repeal not be achieved democratic protests but fear of impending elections | Farm laws Repeal: “लोकशाही मार्गाने आंदोलन करुन साध्य करता आलं नाही ते निवडणुकीच्या भीतीने झालं”: पी. चिदंबरम

Farm laws Repeal: “लोकशाही मार्गाने आंदोलन करुन साध्य करता आलं नाही ते निवडणुकीच्या भीतीने झालं”: पी. चिदंबरम

Next

नवी दिल्ली: गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तीनही कृषी कायदे रद्द (Farm laws Repeal) करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. यानंतर आता शेतकरी आंदोलक आणि विरोधकांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त करण्यात येत आहे. यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्रातील मोदी सरकारला टोला लगावत, लोकशाही मार्गाने आंदोलन करुन जे साध्य करता आले नाही ते निवडणुकीच्या भीतीने साध्य झाले आहे, असे म्हटले आहे. 

पी. चिदंबरम यांनी एकामागून एक ट्विट करत केंद्रातील मोदी सरकाने केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. लोकशाही मार्गाने आंदोलन करुन जे साध्य करताना आले नाही, ते निवडणुकीच्या भीतीने साध्य झाले. पंतप्रधानांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भात केलेली घोषणा ही धोरणांमधील बदलांमुळे किंवा हृदय परिवर्तन झाल्यामुळे नसून निवडणुकांच्या भीतीमुळे घेण्यात आली आहे, अशी टीका चिदंबरम यांनी केली. 

हा शेतकऱ्यांचा सर्वात मोठा विजय आहे

असो हा शेतकऱ्यांचा सर्वांत मोठा विजय आहे. तसेच काँग्रसने सतत या कृषी कायद्यांना केलेल्या विरोधाचा हा विजय आहे, असे चिदंबरम यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे. शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे देशात तीन कृषी कायदे आणले. शेतकऱ्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळावा, त्यांना शेतमाल विकण्यासाठी अनेक पर्याय मिळावे हा उद्देश त्यामागे होता, असे पंतप्रधान मोदी यांनी कायदे रद्द करताना केलेल्या संबोधनात म्हटले.

दरम्यान, कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा एक गटच विरोध करत होता. मात्र ते आमच्यासाठी महत्वाचं होतं. कृषी अर्थशास्त्रांनी, वैज्ञानिकांनी आणि जाणकारांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला. अनेक माध्यमांमधून व्यक्तीगत आणि बैठकांच्या माध्यमातून चर्चा सुरु होती. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना समजून घेण्याचे सर्व प्रयत्न केले. कदाचित आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. शेतकऱ्यांची समजूत घालण्यात कमी पडलो. त्यामुळेच तीन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावे, शेतात जाऊन काम सुरू करावे, एक नवी सुरुवात करावी, असे आवाहन मोदींनी केले. 
 

Web Title: p chidambaram says farm laws repeal not be achieved democratic protests but fear of impending elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.