पी. ए. संगमा यांचे निधन

By admin | Published: March 5, 2016 02:47 AM2016-03-05T02:47:56+5:302016-03-05T04:18:10+5:30

लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे शुक्रवारी सकाळी येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ६८वर्षीय संगमा मेघालयातील तुरा मतदारसंघातून नऊ वेळा निवडून आले होते.

P. A. Sangma passes away | पी. ए. संगमा यांचे निधन

पी. ए. संगमा यांचे निधन

Next

नवी दिल्ली : लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे शुक्रवारी  सकाळी येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ६८वर्षीय संगमा मेघालयातील तुरा मतदारसंघातून नऊ वेळा निवडून आले होते. ईशान्येकडील राज्यांमधून लोकसभाध्यक्षपदाचा मान मिळविणारे ते पहिले नेते होते. 
संगमा यांच्या मागे पत्नी सरोदिनी, मेघालयचे माजी अर्थमंत्री कॉनराड, आमदार जेम्स ही मुले आणि मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये सर्वांत तरुण मंत्री राहिलेल्या कन्या अगाथा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच लोकसभा व राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

पी. ए. संगमा यांचा जन्म १ सप्टेंबर १९४७ रोजी मेघालयातील प.घारो पर्वतीय जिल्ह्णातील चहापाटी या गावी झाला. ते छोट्याशा गावी वाढले. सेंट अ‍ॅन्थनी महाविद्यालयात पदवी घेतल्यानंतर त्यांनी आसाममधील दिब्रुगड विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधात पदव्युत्तर शिक्षण घेतले. राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी काँग्रेसचे धडाडीचे नेते अशी ओळख निर्माण केली. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री बनल्यानंतर नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात ते कामगारमंत्री बनले होते.
ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी २००४ मध्ये राष्ट्रवादीतून बाहेर पडत ममता बॅनर्जी यांच्यासोबत नॅशनलिस्ट तृणमूल काँग्रेस हा पक्ष स्थापन केला होता. संगमा यांनी ईशान्येचा विकास घडवून आणण्यासाठी दिलेले योगदान संस्मरणीय राहील. ते स्वयंभू नेते होते, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली.
ते प्रभावी आणि यशस्वी लोकसभाध्यक्ष होते. ते सक्रिय होते आणि त्यांची प्रकृतीही उत्तम असल्यामुळे निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. -शरद पवार,
संगमा हे देश आणि संसदेसाठी स्मरणात राहतील. आपण संसदेतील एक आदर्श सभापती गमावला आहे. - नितीन गडकरी,
संगमा यांनी लोकसभाध्यक्ष म्हणून त्यांनी उच्च दर्जा मिळविला होता. त्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले आहे. - वेंकय्या नायडू
लोकशाहीवादी नेता हरपला -विजय दर्डा
लोकसभेचे माजी अध्यक्ष पूर्णो संगमा यांच्या निधनामुळे देश एका सभ्य पण तेवढ्याच कणखर लोकशाहीवादी नेत्याला मुकला आहे. त्यांच्यासारखा हसतमुखाने असहमती दर्शविणारा राजकीय नेता क्वचितच आढळतो, अशा शब्दांत लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आणि राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांनी संगमा यांना श्रद्धांजली वाहिली.
ईशान्येकडील राजकारणी म्हणून संगमा यांच्याशी जे संबंध आले त्याचे स्मरण करताना दर्डा म्हणाले, ‘गारो हिल्समधून आलेल्या या नेत्याने उच्च शिखर गाठले, परंतु सर्वसामान्य लोकांशी नाळ कधीच तुटू दिली नाही. ते अतिशय बुद्धिमान आणि उपेक्षित लोकांप्रति संवेदनशील होते.

 

 

Web Title: P. A. Sangma passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.