CoronaVirus News: देशात रुग्णवाढीचा वेग मंदावला, आरोग्य यंत्रणांना मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 05:41 AM2020-05-01T05:41:09+5:302020-05-01T05:51:53+5:30
रुग्ण दुप्पट होण्याचा कालावाधी वाढल्याने आरोग्य यंत्रणांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली.
नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३४ हजार ७८० वर पोहोचली आहे. त्यातील ९०६८ जण बरे झाले असून बुधवारी ६३० जण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १४ दिवसांमध्ये १३.२४ टक्क्यांवरून २५.१९ वर गेले आहे. देशाचा रुग्ण दुप्पट होण्याचा सरासरी वेग ३.४ वरून ११ दिवसांवर आला आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावाधी वाढल्याने आरोग्य यंत्रणांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली.
देशात दररोज सरासरी ४९ हजार ८०० आरटीपीसीआर चाचण्या होत आहेत. बुधवारी एकूण ५८ हजार ६८६ जणांची चाचणी करण्यात आली. गेल्या १५ दिवसांत भारताने कोरोना चाचणी क्षमतेत लक्षणीय वाढ केल्याचा दावा संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी केला. सरकारी २९१ तर खासगी ५७ लॅबमध्ये चाचणीला परवानगी दिली आहे. चाचण्या कमी होत असल्याने रुग्ण संख्या कमी दिसते, हा दावा त्यांनी फेटाळला. बुधवारी देशात १७८० नवे रुग्ण आढळले. रुग्णांच्या वाढीच्या वेगाबाबत अगरवाल म्हणाले की, ११ ते २० दिवसांमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण दिल्ली, ओडीशा, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश व पंजाबमध्ये आहे तर २० ते ४० दिवसांमध्ये कर्नाटक, लद्दाख, हरियाणा, उत्तराखंड व केरळमध्ये रुग्ण दुप्पट होतात. देशात मृत्यूदर ३.२ टक्के आहे. ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूदर ९१ टक्के असल्याने ज्येष्ठांची काळजी घेण्याची सूचना पुन्हा एकदा अगरवाल यांनी केली.
>राज्यात १०४९८ रुग्ण
राज्यात एप्रिलअखेरीस १० हजार ४९८ कोरोना रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी ५८३ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परिणामी, कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ४५९वर पोहोचली आहे. मुंबईत दिवसभारत ४१७ कोरोना रुग्णांचे निदान झाले.
>आशियात ५ लाख
आशियातील ४८ देशांत कोरोनाचे ८०६४ नवे रुग्ण आढळले. या देशांत रुग्णांची संख्या ५ लाख १५ हजारांवर गेली आहे, तर मृतांचा आकडा १८,४२९ झाला आहे. जगभरात २ लाख ३१ हजार लोक मरण पावले असून, त्यापैकी ६२ हजार एकट्या अमेरिकेतील आहेत.
>मृत्यूदर वयोगट
४५ पेक्षा कमी १४ टक्के
४५ ते ६० ३४.८ टक्के
६० पेक्षा जास्त ५१.२
७५ पेक्षा जास्त ९१ टक्के