पॅकेजमुळे बिहारमध्ये आर्थिक विकास निश्चित
By admin | Published: September 20, 2015 10:54 PM2015-09-20T22:54:27+5:302015-09-20T22:54:27+5:30
१४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींमुळे बिहारला केंद्राकडून मिळणाऱ्या निधीत मोठी घट होईल, हा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा दावा
नवी दिल्ली : १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशींमुळे बिहारला केंद्राकडून मिळणाऱ्या निधीत मोठी घट होईल, हा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा दावा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी खोडून काढला आहे. असा दावा करणे हा नितीशकुमार यांचा ‘गैरसमज’ असल्याचे जेटली यांनी म्हटले आहे.
नितीशकुमार यांनी ‘गैरसमजातून’ असा दावा केला असला तरी पुढच्या पाच वर्षांत बिहारला मिळणारा निधी वाढून ४.०८ लाख कोटींपर्यंत जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी जाहीर केलेल्या १.२५ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे आता तळागाळात ठोक विकासकामे दिसू लागतील, असा दावाही जेटली यांनी केला आहे.
नितीशकुमार यांनी या महिन्यात लिहिलेल्या एका पत्राला मुद्देसूद उत्तर देताना जेटली पुढे म्हणतात, ‘बिहारसाठी पॅकेजची घोषणा हे राज्याचा सर्वांगीण विकास आणि राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने दर्शविलेल्या अटळ कटिबद्धतेचेच निदर्शक आहे.’
जेटली यांनी हे पत्र नितीशकुमार यांना पाठविले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पातील अर्थसंकल्पीय साहाय्यतेत घट केल्यामुळे केंद्रीय करांमधील वाट्यात लक्षणीय वाढ झाली आहे, असे म्हणणे दिशाभूल करणारे आहे, असेही जेटली यांनी या पत्रात स्पष्ट केले.