एक पॅकेज घसघशीत, तुम्हीही व्हाल सद्गदित!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 12:31 PM2020-05-17T12:31:37+5:302020-05-17T12:41:33+5:30
मालकांनी जेव्हा फक्त त्यांच्याशीच चर्चा करण्यासाठी आजची वेळ ठरवली तेव्हा ते तीच तलवार मानेवर कोसळण्याच्या तयारीने बसले होते…
-मुकेश माचकर
‘मी तुम्हाला एक पॅकेज द्यायचं ठरवलंय… एक कोटी रुपयांचं…’ हे शब्द ऐकताच मोठ्या साहेबांना आश्चर्याचा धक्का बसला… अर्थातच सुखद आश्चर्याचा… …तसं मोठ्या साहेबांचं मालकांबरोबर व्हिडिओ काॅन्फरन्सिंग रोजच सुरू होतं. कंपनीचे कोणकोणते विभाग पूर्णपणे बंद पडलेले आहेत, कुठे प्राॅडक्शन सुरू आहे, किती सुरू आहे, तिथून माल कुठे जातोय का, अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी रोज चर्चा होतच होती मोठ्या साहेबांची आणि त्यांच्या इतर वरिष्ठ सहकाऱ्यांची. पण, एकंदर नुकसान पाहता मालक आपल्याशी ‘एका महत्त्वाच्या आणि नाजुक विषयावर’ कधी ना कधी बोलतील, याची त्यांना कल्पना होतीच… त्यासाठी त्यांनी मनोमन तयारीही केली होती… करोनासंकटाने दिलेल्या तडाख्यानंतर कामगार कपात होणार, आपले पगार गोठवले जाणार, इन्क्रिमेंट, भत्ते बंद होणार, थोडा पे कट सोसावा लागणार, याची अटकळ त्यांनी बांधली होतीच. त्यामुळे मालकांनी जेव्हा फक्त त्यांच्याशीच चर्चा करण्यासाठी आजची वेळ ठरवली तेव्हा ते तीच तलवार मानेवर कोसळण्याच्या तयारीने बसले होते…
पण मालकांनी हा वेगळाच बाँब टाकून त्यांची पुरती विकेट काढली होती… पॅकेजच्या घोषणेनंतर मालक म्हणाले, ‘मीही ही कंपनी शून्यातून निर्माण केली आहे. माझ्यापाशीही कधीतरी काही नव्हतं. ते दिवस मी विसरलेलो नाही. त्यामुळे मला कामगारांची, तुमची काय अवस्था असेल, याची कल्पना आहे. हे संकट काही तुमच्यामाझ्यापैकी कुणी आणलेलं नाही. ते अचानक कोसळलंय, सगळ्या जगावर येऊन कोसळलंय ते. आपला काही अपवाद नाही. त्यामुळे या काळात माणुसकीने विचार करण्याची गरज आहे…’ मोठ्या साहेबांच्या डोळयांत आता अश्रू यायचेच बाकी होते, मालक म्हणाले, ‘तुम्हाला तर कल्पना आहे, मी किती साधा माणूस आहे, निरिच्छ आहे, माझ्या गरजाही फार कमी आहेत. मी या कंपनीचा मालक नाही तर विश्वस्तच मानतो स्वत:ला. मला शक्य असतं तर मी एखाद्या झोपडीत राहिलो असतो आणि साध्या सदरा-पायजम्यावर रोज सायकलवरून आॅफिसात आलो असतो… पण कंपनीची काहीएक गरिमा असते, ती सांभाळावी लागते शेवटी मला. देशात १५ आणि विदेशांत १० बंगले, तीन प्रायव्हेट जेट, १२ हेलिकाॅप्टर, महागडे सूटबूट, सप्ततारांकित जीवनशैली हा सगळा फक्त देखावा आहे. त्याच्याआतला मी लसणीचा ठेचा आणि भाकर घेऊन कांद्यासोबत खाणारा साधासुधा माणूसच आहे…’ आता मोठ्या साहेबांच्या डोळ्यांतून अश्रू टपकलाच… मोठे साहेब म्हणाले, ‘म्हणूनच मी ठरवलंय की आपल्यासाठी, कंपनीसाठी दिवसरात्र काम करणाऱ्या लोकांना या विपदेच्या काळात धीर द्यायचा, आधार द्यायचा, त्यांच्यासाठी एक पॅकेज द्यायचं. तुमचं पॅकेज आहे एक कोटी रुपयांचं…’
सद्गतित स्वरात मोठे साहेब म्हणाले, ‘आपल्यासोबत काम करत असल्याचा अभिमान मला होताच, तो आता द्विगुणित झाला. या काळात लोक पगार कापतायत, नोकऱ्यांवरून माणसं कमी करतायत, त्यात तुम्ही पॅकेज देताय, तुम्ही थोर आहात…’
मालक म्हणाले, ‘नाही हो. मी एक हाडामांसाचाच माणूस आहे, देव नाही. बरं आता तुमच्या पॅकेजचे तपशील सांगतो. हे पॅकेज पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होईल. या वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला २५ लाख रुपये इन्क्रिमेंट मिळालं होतं ना? या वर्षातच हा फटका बसलेला असल्याने आपण ते या पॅकेजमध्ये जोडून घेऊ या! कंपनीने तुम्हाला या वर्षी २५ लाखांची नवी गाडीही दिली होती ना! तेही या पॅकेजमध्ये जोडू…’ आता मोठ्या साहेबांचे कान टवकारले, अजून ५० लाख रुपये शिल्लक होते त्यामुळे ते तसे निश्चिंत होते… मालक म्हणाले, ‘तुमचा वार्षिक पगार आहे २० लाख रुपये आणि पर्क्स आहेत पाच लाख रुपयांचे. सध्याच्या स्थितीत ते देणं शक्य नाही, त्यामुळे तेही आपण पॅकेजमध्ये गणू या! ते ६० लाख रुपये झाले…’
मोठ्या साहेबांच्या घशाला आता कोरड पडली, ते म्हणाले, ‘मालक ही रक्कम तर एक कोटीपेक्षा जास्त झाली… ’
मालक मृदू स्वरात म्हणाले, ‘हो ना, म्हणूनच तुमच्या पगारात पाच लाखांनी कपात करण्याच्या ऐवजी अडीच लाखांची कपात करण्याचा निर्णय घेतलाय मी आणि ती रक्कम आता फक्त ३० लाखांची झाली आहे…’
मोठे साहेब चाचरत म्हणाले, ‘म्हणजे मीच कंपनीला ४० लाख रुपये देणं आहे?…’
मालक खळखळून हसत म्हणाले, ‘असा नकारात्मक विचार करू नका… पॅकेज नसतं तर काय झालं असतं हा विचार करा… शिवाय ही रक्कम काही आता वळती करून घेतली जाणार नाहीये… ती आपण अडीच अडीच लाखाच्या हप्त्यांनी कापून घेऊ या…’
मोठे साहेब म्हणाले, ‘म्हणजे माझा पगार २५ लाखांवरून १५ लाख झाला आहे तर…’
मालक म्हणाले, ’१० लाखांत हे काम करायला तुमच्या हाताखालचे बरेच अधिकारी तयार आहेत. ते तरूण आहेत, धडाडीचे आहेत. पण, मी माणुसकीला महत्त्व देणारा माणूस आहे… कसाही असला तरी आपला माणूस तो आपला माणूस.’
मोठ्या साहेबांना यातल्या ‘कसाही असला’चा अर्थ बरोबर समजला!
त्यांनी मालकांकडून सर्व कर्मचाऱ्यांसाठीचं पॅकेज समजावून घेतलं… एकीकडे सगळ्या वर्तमानपत्रांतून ‘करोनाकाळात या कंपनीने दिलं कामगारांना पॅकेज’ अशा बातम्या दिल्या गेल्या आणि मोठ्या साहेबांनी छोट्या साहेबांना, छोट्या साहेबांनी साहेबांना आणि साहेबांनी स्टाफला, कामगारांना, मजुरांना पॅकेज दिलं आणि समजावूनही सांगितलं…
………………………………..
झूमवरची काॅन्फरन्स काॅलवरची मीटिंग संपल्यानंतर कंपनीचा सगळ्यात शेवटच्या फळीतला कर्मचारी असलेला महादू मीटिंगमध्ये काय झालं हे जाणून घेण्यासाठी उत्सुकतेने पाहात असलेल्या बायकोला म्हणाला, ‘कंपनीने पॅकेज दिलंय पॅकेज.’
‘म्हणजे टीव्हीवरची बातमी खरी होती म्हणायची. देव भलं करो तुमच्या मालकांचं,’ महादूच्या पत्नीच्या डोळ्यांत पाणी तरळलं.
महादू म्हणाला, ‘पॅकेज आहे पंचवीस हजाराचं, पण कंपनीच्या हिशोबाप्रमाणे माझ्यावरच तीस हजार निघतात. माझा पगार दहा हजारावरून आठ हजार होणार आणि त्यातून दर महिन्याला तीन हजार रुपये कापून घेतले जाणार. पटत नसेल तर ३० हजार भरून नोकरीचा राजीनामा देण्याचा मार्ग खुला आहेच.’
महादूचा कसनुसा झालेला चेहरा पाहून बायको म्हणाली, ‘आता नोकरी टिकवणं महत्त्वाचं आहे. पुढे बघू कसं करायचं ते. जास्त विचार करू नका, पंचपक्वान्नांचं जेवण वाढलंय, ते जेवायला या!’
घरातला शिधा संपायला आलेला असताना पंचपक्वान्नांचं जेवण? महादूने उत्सुकतेने ताटाकडे पाहिलं… बायको म्हणाली, ‘हा कालचा शिळा भात लसणीची फोडणी दिलेला, या सकाळच्या भाकऱ्या, हा मिरचीचा खर्डा, हा कांदा आणि हा गुळाचा खडा… झाली ना पाच पक्वान्नं?… तुमच्या मालकांनी दिलेल्या पॅकेजमध्ये आपण असं पंचपक्वान्नांचं जेवण जेवतोय, याचा आनंद माना…’
महादूने हसून भाकरीचा तुकडा मोडला आणि जेवायला सुरुवात केली…