पाककलेसाठीही मिळणार 'पद्म' पुरस्कार?
By Admin | Published: November 19, 2015 10:07 AM2015-11-19T10:07:39+5:302015-11-19T12:50:09+5:30
'पद्म' पुरस्कारांच्या यादीत आता पाककलेचाही समावेश होण्याची शक्यता असून स्वयंपाकी व शेफ्स यांनाही 'पद्म' पुरस्काराने गौरवले जाऊ शकते
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - अनेक कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी दिल्या जाणा-या देशातील सर्वोच्च 'पद्म' पुरस्कारांच्या यादीत आता पाककलेचाही समावेश होण्याची शक्यता असून स्वयंपाकी व शेफ्स यांनाही 'पद्म' पुरस्काराने गौरवले जाऊ शकते. स्वयंपाक ही एक कला असल्यानेच 'पाककले'चा पद्म पुरस्कारांच्या यादीत समावेश करावा अशी शिफारस करणारा प्रस्ताव नुकताच सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
संगीत, तबला वादन अशा कलासांठी पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येतात, मग पाककलेचा त्यामध्ये समावेश का नाही, असा सवाल या प्रस्तावात करण्यात आला आहे. या प्रस्तावाचा अभ्यास करून पाककलेचा पद्म पुरस्कारांच्या यादीत समावेश करण्याबद्दलची शिफारस करत आम्ही हा प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे, असे सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांनी नमूद केले आहे.
काही महिन्यांपूर्वी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या शर्मा यांना ही कल्पना सुचली. त्या कार्यक्रमास सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्यासह अनेक नामवंत स्वयंपाकी हजर होते. भारतीय मसाले व पदार्थ जगभरात लोकप्रिय आहेत. पाककलेचा 'पद्म' पुरस्कारांच्या यादीत समावेश झाल्यास या कलेचा गौरव होईल आणि त्यामुळे या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधीही वाढतील, असेही शर्मा यांनी नमूद केले.
स्वयंपाक कलेने इतक्या काळात मोठा पल्ला गाठला आहे, आधी स्वयंपाकाची हेटाळणी केली जायची मात्र अाता त्याकडे कला म्हणून पाहिले जाते. आत्तापर्यंत फक्त सुप्रसिद्ध शेफ तरला दलाल यांना 'पद्म' पुरस्कार देण्यात आला होता, मात्र तोही इतर या कॅटॅगरीद्वारे देण्यात आला. पाककला ही इतर प्रकारांमध्ये येऊ शकत नाही, असे मत सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी मांडले.