सिंधूताईंसह राज्यातील सहा जणांना पद्म पुरस्कार; उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्मभूषण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 03:14 AM2021-01-26T03:14:43+5:302021-01-26T03:15:08+5:30
नामदेव कांबळे, गिरीश प्रभुणे यांचाही समावेश
नवी दिल्ली : पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, साहित्यिक नामदेव कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांच्यासह महाराष्ट्रातील सहा जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. उद्योगपती रजनीकांत श्रॉफ यांना पद्म भूषण तर शेकडो अनाथांना मायेने सांभाळणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, भटक्या विमुक्तांसाठी काम करणारे ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे, ‘राघव वेळ’ या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीचे लेखक नामदेव कांबळे, कळसुत्री बाहुल्यांची कला जिवंत ठेवलेले परशुराम गंगावणे आणि उद्योजिका जयवंतीबेन जमनादास पोपट यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. गोव्याचे संशोधक विनायक खेडेकर यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.