लाच देण्यास नकार दिल्यामुळे पद्मभूषण उस्ताद राशिद खान यांची कार जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 06:23 PM2022-12-07T18:23:30+5:302022-12-07T18:23:39+5:30
प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मभूषण उस्ताद राशिद खान यांनी 'लाच' देण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांनी छळ केल्याचा आरोप केला आहे.
भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार/गायक पद्मभूषण उस्ताद राशिद खान यांनी 'लाच' देण्यास नकार दिल्यामुळे पोलिसांनी छळ केल्याचा आरोप केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी रात्री उशिरा कोलकात्याच्या दमदम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर एका प्रसिद्ध संगीतकाराला सोडल्यानंतर रशीद खान यांचा चालक कार घेऊन परतत होता.
यावेळी बेलेघाटा ट्रॅफिक गार्ड पोलिसांनी त्यांची गाडी अडवली आणि लाच मागितली. पैसे देण्यास नकार दिल्याने चालकाशी गैरवर्तन करण्यात आले. तसेच, कार चालकाला अटक करून प्रगती मैदान पोलिस ठाण्यात नेण्यात आले. पोलिस रशीद खान यांचे वाहनही ठाण्यातच ठेवून घेतले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रशीद खान यांनी पहाटे पोलीस ठाण्यात फोन करून चालकाला अटक करण्याचे कारण विचारले.
यानंतर राशिद खान यांना पोलिस स्टेशनमध्ये येण्यास सांगितले. खान यांनी पोलीस ठाणे गाठले, यावेळी चालकाला आणि कारला सोडून देण्यात आले. या घटनेमुळे खान यांच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या घटनेची माहिती राज्याचे मंत्री इंद्रनील सेन यांना फोनवरून आधीच दिली होती. अनेक उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनाही या घटनेची स्वतंत्रपणे माहिती देण्यात आली. मात्र, पोलिसांकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
यावर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित
उस्ताद राशिद खान यांना यावर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राशीद खान हे कोलकाता येथील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीत कलाकार आहेत. ते रामपूर-सहस्वान घरान्यातील आहेत. त्यांना यापूर्वी पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी देश-विदेशात शास्त्रीय संगीताचे अनेक कार्यक्रम केले असून शास्त्रीय संगीताच्या जगात त्यांचे खूप नाव आहे.