ओडिशाच्या मांझींना परत करायचाय 'पद्मश्री'; रोजगार नसल्यानं कुटुंबाचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 11:17 AM2019-06-25T11:17:19+5:302019-06-25T11:26:27+5:30
मजुरीचं काम बंद झाल्यानं कुटुंबाचे प्रचंड हाल
भुवनेश्वर: डोंगरातून 3 किलोमीटरचा कालवा खणल्यानं यंदा पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या दैतारी नायक सध्या रोजगार नसल्यानं हवालदिल झाले आहेत. पद्मश्री पुरस्कारानं रोजगार मिळण्यात अडथळे येत असल्यानं चरितार्थ चालवणं कठीण होत असल्याची व्यथा नायक यांनी मांडली. तर सरकारनं आश्वासन न पाळल्याचा आरोप त्यांच्या मुलानं केला.
ओडिशाच्या केनोझार जिल्हातील तालाबैतरणी गावात राहणाऱ्या 75 वर्षीय दैतारी नायक यांना यंदा पद्मश्री मिळाला. गोनासिका डोंगरातून कुदळ आणि फावड्याच्या मदतीनं कालवा खणल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. 2010 ते 2013 या कालावधीत त्यांनी केलेल्या भगीरथ प्रयत्नांमुळे 100 एकर जमीन सिंचनाखाली आली. याबद्दल सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला. मात्र याच पुरस्कारामुळे आपल्याला अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं दैतारी यांनी सांगितलं. त्यामुळेच हा पुरस्कार परत करायची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
मला पद्मश्री पुरस्काराचा कोणताही उपयोग नाही, अशा तीव्र शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 'मी आधी मजूर म्हणून शेतात काम करायचो. मात्र आता मलाही कोणीही काम देत नाही. पद्मश्री मिळाल्यानं मजुरीचं काम दिल्यास तो पुरस्कराचा अपमान ठरेल, अशी लोकांची भावना असते. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे,' अशी व्यथा दैतारी नायक यांनी मांडली. मी सध्या तेंदूची पानं आणि आंब्याचे पापड विकून कसाबसा उदरनिर्वाह करत आहे. त्यामुळे मला पद्मश्री पुरस्कार परत करायचा आहे, अशा शब्दांत त्यांनी उद्विग्नता व्यक्त केली.