Padmaavat Controversy : वाराणसीत सिनेमागृहाबाहेर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 01:27 PM2018-01-25T13:27:28+5:302018-01-25T13:41:41+5:30
संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा वादविवादांमध्ये चार राज्य वगळता देशभरातील सिनेमागृहांमध्ये रिलीज करण्यात आला आहे.
नवी दिल्ली - संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' सिनेमा वादविवादांमध्येच चार राज्य वगळता देशभरातील सिनेमागृहांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू भाषांसहीत हा सिनेमा 6 ते 7 हजार स्क्रीन्सवर झळकला आहे. दरम्यान, सिनेमाला विरोध करणा-या करणी सेनेनं देशव्यापी बंदची हाक दिली केली आहे. वादग्रस्त ‘पद्मावत’ सिनेमाला होणारा विरोध पाहता राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यातील मल्टिप्लेक्स असोसिएशनने सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील अनेक भागांमध्ये राजपूत संघटना आणि करणी सेनेकडून हिंसक आंदोलनं सुरू आहेत.
देशभरातील ७५ टक्के मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांचे प्रतिनिधित्व करणा-या ‘मल्टिप्लेक्स असोसिएसन ऑफ इंडिया’ या संघटनेने संभाव्य हिंसाचाराची भीती लक्षात घेऊन राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ हा चित्रपट न दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे अध्यक्ष दीपक अशर यांनी सांगितले की, या राज्यांमध्ये सुरू झालेला व होऊ शकणारा हिंसाचार पाहता, प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी आमचे सदस्य हा चित्रपट त्यांच्या मल्टिप्लेक्समध्ये दाखविणार नाहीत.
पाटणा वगळता बिहारमध्ये सर्वत्र सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. करणी सेना आणि राजपूत संघटनांसंबंधित लोकांकडून रिलीजच्या दिवशीदेखील सिनेमाविरोधात हिंसक आंदोलन सुरूच आहेत.
वाराणसीमध्ये तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
वाराणसीमध्ये पद्मावत सिनेमाविरोधात सुरू असलेल्या निदर्शनादरम्यान सिगरा येथील आयपी मॉलबाहेर एक तरुणानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. सतर्क पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या तरुणाला ताब्यात घेतले. याप्रकरणी एकूण 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Man tries to self immolate outside a cinema hall in Varanasi, detained by Police. #Padmaavatpic.twitter.com/lIGVaaozct
— ANI UP (@ANINewsUP) January 25, 2018
पंजाबमधील राजपूतांनी पाहिला 'पद्मावत'; चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नाही, विरोध मागे घेण्याचं आवाहन
पंजाबमधील राजपूत महासभाने 'पद्मावत' चित्रपटाला असलेला विरोध मागे घेतला आहे. बुधवारी राजपूत समाजाशी संबंधित काही लोकांनी पठाणकोटमध्ये स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान 'पद्मावत' चित्रपट पाहिला. जिल्हा प्रशासनाकडून संध्याकाळी 6 ते 9 दरम्यान स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. राजपूत महासभा आतापर्यंत या चित्रपटाचा विरोध करत होती, ज्यामुळे चित्रपटात 300 हून अधिक सीन्सवर कात्री चालवण्यात आली. चित्रपट पाहिल्यानंतर राजपूत महासभाचे अध्यक्ष दविन्दर दर्शी यांनी सांगितलं की, 'याआधी आम्ही चित्रपटाचा विरोध करत होतो, ज्यामुळे चित्रपट बनवणा-यांना 300 कट्स करावे लागले'.
'आज आम्ही चित्रपट पाहिला, यामध्ये राजपूत समाजाविरोधात काहीही आक्षेपार्ह नाहीये, आम्ही संतृष्ट आहोत आणि चित्रपट रिलीज होण्यामध्ये काहीच अडचण नाही', असं त्यांनी म्हटलं आहे. 'राजपूत समाजाच्या 30 नेत्यांनी प्रशासनाच्या विनंतीनंतर हा चित्रपट पाहिला असून, आता यामध्ये कोणताच वाद नाही', असंही ते बोलले आहेत. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'मोठ्या संख्येने शिख आणि हिंदू राजपूत पठाणकोट, होशियारपूर आणि गुरुदासपूर जिल्ह्यात वसले आहेत'. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या संघटनेच्या शाखा आणि पदाधिकारी दुस-या जिल्ह्यांतही आहेत आणि आता चित्रपटाशी संबंधित कोणताच वाद उरलेला नाही. राजपूत समाजाशी संबंधित काही काँग्रेस नेत्यांनीही हा वाद सोडवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली.
पाकिस्तानमध्ये 'पद्मावत'ला मिळालं 'U' सर्टिफिकेट, रिलीज होणार सिनेमा
संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला देशभरात करणी सेनेकडून तीव्र विरोध केला जात आहे. विरोधाच्या नावाखाली ठिकठिकाणी जाळपोळ व तोडफोड करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, शेजारील देश पाकिस्तानानं 'पद्मावत' सिनेमाला यू सर्टिफिकेट देत सिनेमाच्या प्रदर्शनाला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे भन्साळींचा पद्मावत पाकिस्तानातील सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.
आपल्या सेन्सॉन बोर्डनं सिनेमाला यू-ए सर्टिफिकेट दिलंय तर पाकिस्तानानं पद्मावतला यू सर्टिफिकेट दिले आहे.
करणी सेनेने BookmyShow ला दिली धमकी
करणी सेनेने चित्रपटाची तिकीटविक्री करणा-या कंपनी BookmyShow ला देखील धमकी दिली आहे. 'पद्मावत चित्रपटाची तिकीटविक्री बंद करा अन्यथा विक्री करण्याच्या लायकीचं ठेवणार नाही', अशी धमकी करणी सेनेने दिली आहे.
4 राज्यांविरोधात सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल
सुप्रीम कोर्टाने पद्मावत संपूर्ण देशात प्रदर्शित करण्याचा निर्णय दिलेला असतानाही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्यात सिनेमा प्रदर्शित करण्यात आलेला नाही. या राज्यांमध्ये पद्मावतविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्यामुळे सुप्रीम कोर्टात या राज्यांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना अपयश आल्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. सोबत न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी करणी सेनेच्या तीन कार्यकर्त्यांविरोधातही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
'पद्मावत'ला विरोध करणाऱ्या करणी सेनेचा शाळेच्या बसवर हल्ला
लज्जास्पद आणि तितकीच संतापजनक बाब म्हणजे 'पद्मावत' सिनेमाला विरोध करणाऱ्या कथित संस्कृती रक्षकांनी बुधवारी(24 जानेवारी) गुरुग्राममध्ये चक्क लहान मुले असलेल्या एका शाळेच्या बसवर हल्ला केला. बसमधील सीटचा आसरा घेत शाळकरी विद्यार्थी आणि शाळेच्या कर्मचा-यांनी कसेबसे स्वतःला या हल्ल्यातून वाचवलं. जमावाने दगड आणि काठ्यांनी बसच्या खिडकीच्या काचा फोडल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार घडला तेव्हा बसमध्ये नर्सरी ते आठवी इयत्तेचे एकूण दहा विद्यार्थी होते. तसेच बसमध्ये एक शिक्षक, कंडक्टर आणि मदतनीसही होता. ही बस जात असलेल्या रस्त्यावर जमावाने आधीच हरियाणा वाहतूक विभागाच्या बसला पेटवली होती. त्यानंतर जमावाने शाळेच्या बसवरही हल्ला केला. मात्र, कुणालाही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. याप्रकरणी 18 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.