Padmaavat Controversy : पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ मुस्लिमांना दाखवतात 56 इंचांची छाती - असदुद्दीन ओवेसी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 02:10 PM2018-01-25T14:10:09+5:302018-01-25T14:14:58+5:30
'पद्मावत' सिनेमाविरोधात सुरू असलेल्या हिंसाचारावरून एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर बोचरी टीका केली आहे.
नवी दिल्ली - 'पद्मावत' सिनेमाविरोधात सुरू असलेल्या हिंसाचारावरून एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर बोचरी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा पद्मावतला विरोध करणाऱ्यांपुढे सहजपणे मान झुकवत आहेत. फक्त मुस्लिमांसाठीच दाखवायला त्यांच्याकडे 56 इंचाची छाती आहे, अशा शब्दांत ओवेसी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. ओवेसींच्या या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात ओवेसी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले की, भाजपाकडून केवळ 'पकौडा' पॉलिटिक्स करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पार्टीनं पद्मावत प्रकरणात गुडघे टेकले आहेत. केवळ मुस्लिमांनाच दाखवायला त्यांच्याजवळ 56 इंचाची छाती आहे
ओवेसी पुढे असंही म्हणाले की, पंतप्रधान यांनी 12 सदस्यीय समिती स्थापन करत सिनेमातील काही दृश्यांवर कात्री फिरवली होती. जायसी यांनी 1540 साली 'पद्मावत'ची कहाणी लिहिली होती, मात्र याबाबत ठोस असा पुरावा नाही. तरीही केवळ कांदबरीच्या आधारे सरकारनं सिनेमा प्रदर्शित करण्याचं स्वारस्य दाखवलं आहे. जेव्हा मुस्लिमांसंदर्भातील कायद्याची एखादी गोष्ट समोर येते तेव्हा मोदींच्या नेत्यांना इतरांच्या सूचना विचारात घेण्याची गरज वाटत नाही.
चार राज्य वगळता देशभरात पद्मावत सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमा रस्त्यांपासून ते सोशल मीडियावरदेखील विरोध दर्शवण्यात येत आहे. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि मध्य प्रदेशसहीत अनेक राज्यांमध्ये हिंसक निदर्शनं सुरू आहेत.
This is nothing but 'pakoda' politics practiced by BJP. Prime Minister & his party have meekly surrendered before these people who are protesting. He has 56 inch chest only for Muslims: Asaduddin Owaisi, AIMIM #Padmaavatpic.twitter.com/37Chkd5pg3
— ANI (@ANI) January 25, 2018
वाराणसीमध्ये तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
वाराणसीमध्ये पद्मावत सिनेमाविरोधात सुरू असलेल्या निदर्शनादरम्यान सिगरा येथील आयपी मॉलबाहेर एक तरुणानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. सतर्क पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या तरुणाला ताब्यात घेतले. याप्रकरणी एकूण 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पंजाबमधील राजपूतांनी पाहिला 'पद्मावत'; चित्रपटात काहीही आक्षेपार्ह नाही, विरोध मागे घेण्याचं आवाहन
पंजाबमधील राजपूत महासभाने 'पद्मावत' चित्रपटाला असलेला विरोध मागे घेतला आहे. बुधवारी राजपूत समाजाशी संबंधित काही लोकांनी पठाणकोटमध्ये स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान 'पद्मावत' चित्रपट पाहिला. जिल्हा प्रशासनाकडून संध्याकाळी 6 ते 9 दरम्यान स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. राजपूत महासभा आतापर्यंत या चित्रपटाचा विरोध करत होती, ज्यामुळे चित्रपटात 300 हून अधिक सीन्सवर कात्री चालवण्यात आली. चित्रपट पाहिल्यानंतर राजपूत महासभाचे अध्यक्ष दविन्दर दर्शी यांनी सांगितलं की, 'याआधी आम्ही चित्रपटाचा विरोध करत होतो, ज्यामुळे चित्रपट बनवणा-यांना 300 कट्स करावे लागले'.
'आज आम्ही चित्रपट पाहिला, यामध्ये राजपूत समाजाविरोधात काहीही आक्षेपार्ह नाहीये, आम्ही संतृष्ट आहोत आणि चित्रपट रिलीज होण्यामध्ये काहीच अडचण नाही', असं त्यांनी म्हटलं आहे. 'राजपूत समाजाच्या 30 नेत्यांनी प्रशासनाच्या विनंतीनंतर हा चित्रपट पाहिला असून, आता यामध्ये कोणताच वाद नाही', असंही ते बोलले आहेत. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'मोठ्या संख्येने शिख आणि हिंदू राजपूत पठाणकोट, होशियारपूर आणि गुरुदासपूर जिल्ह्यात वसले आहेत'. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या संघटनेच्या शाखा आणि पदाधिकारी दुस-या जिल्ह्यांतही आहेत आणि आता चित्रपटाशी संबंधित कोणताच वाद उरलेला नाही. राजपूत समाजाशी संबंधित काही काँग्रेस नेत्यांनीही हा वाद सोडवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली.
पाकिस्तानमध्ये 'पद्मावत'ला मिळालं 'U' सर्टिफिकेट, रिलीज होणार सिनेमा
संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला देशभरात करणी सेनेकडून तीव्र विरोध केला जात आहे. विरोधाच्या नावाखाली ठिकठिकाणी जाळपोळ व तोडफोड करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, शेजारील देश पाकिस्तानानं 'पद्मावत' सिनेमाला यू सर्टिफिकेट देत सिनेमाच्या प्रदर्शनाला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे भन्साळींचा पद्मावत पाकिस्तानातील सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.
आपल्या सेन्सॉन बोर्डनं सिनेमाला यू-ए सर्टिफिकेट दिलंय तर पाकिस्तानानं पद्मावतला यू सर्टिफिकेट दिले आहे.
करणी सेनेने BookmyShow ला दिली धमकी
करणी सेनेने चित्रपटाची तिकीटविक्री करणा-या कंपनी BookmyShow ला देखील धमकी दिली आहे. 'पद्मावत चित्रपटाची तिकीटविक्री बंद करा अन्यथा विक्री करण्याच्या लायकीचं ठेवणार नाही', अशी धमकी करणी सेनेने दिली आहे.
4 राज्यांविरोधात सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल
सुप्रीम कोर्टाने पद्मावत संपूर्ण देशात प्रदर्शित करण्याचा निर्णय दिलेला असतानाही राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्यात सिनेमा प्रदर्शित करण्यात आलेला नाही. या राज्यांमध्ये पद्मावतविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश आल्यामुळे सुप्रीम कोर्टात या राज्यांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना अपयश आल्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. सोबत न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी करणी सेनेच्या तीन कार्यकर्त्यांविरोधातही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
'पद्मावत'ला विरोध करणाऱ्या करणी सेनेचा शाळेच्या बसवर हल्ला
लज्जास्पद आणि तितकीच संतापजनक बाब म्हणजे 'पद्मावत' सिनेमाला विरोध करणाऱ्या कथित संस्कृती रक्षकांनी बुधवारी(24 जानेवारी) गुरुग्राममध्ये चक्क लहान मुले असलेल्या एका शाळेच्या बसवर हल्ला केला. बसमधील सीटचा आसरा घेत शाळकरी विद्यार्थी आणि शाळेच्या कर्मचा-यांनी कसेबसे स्वतःला या हल्ल्यातून वाचवलं. जमावाने दगड आणि काठ्यांनी बसच्या खिडकीच्या काचा फोडल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार घडला तेव्हा बसमध्ये नर्सरी ते आठवी इयत्तेचे एकूण दहा विद्यार्थी होते. तसेच बसमध्ये एक शिक्षक, कंडक्टर आणि मदतनीसही होता. ही बस जात असलेल्या रस्त्यावर जमावाने आधीच हरियाणा वाहतूक विभागाच्या बसला पेटवली होती. त्यानंतर जमावाने शाळेच्या बसवरही हल्ला केला. मात्र, कुणालाही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. याप्रकरणी 18 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.