चार हजार थिएटर्समध्ये ‘पद्मावत’ प्रदर्शित, पहिल्याच दिवशी १0 लाख लोकांनी चित्रपट पाहिल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 03:51 AM2018-01-26T03:51:48+5:302018-01-26T03:52:00+5:30
उग्र व हिंसक निदर्शनांना तोंड द्यावे लागलेला ‘पद्मावत’ चित्रपट गुरुवारी अतिशय कडक पोलीस बंदोबस्तात प्रदर्शित झाला. काही ठिकाणी राखीव दलाच्या जवानांनाही तैनात करण्यात आले होते.
नवी दिल्ली : उग्र व हिंसक निदर्शनांना तोंड द्यावे लागलेला ‘पद्मावत’ चित्रपट गुरुवारी अतिशय कडक पोलीस बंदोबस्तात प्रदर्शित झाला. काही ठिकाणी राखीव दलाच्या जवानांनाही तैनात करण्यात आले होते.
गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान या भाजपाशासित राज्यांत तो प्रदर्शित झाला नाही, तर उत्तर प्रदेश, हरयाणा, उत्तराखंड, तामिळनाडूमध्ये तो काही ठिकाणीच झळकला. मात्र महाराष्ट्रासह बंगाल, आंध्र प्रदेश आदी नऊ महत्त्वाच्या राज्यांतील चित्रपटगृहांत तो विनाविघ्न प्रदर्शित झाला. हा चित्रपट पहिल्या दिवशी चार हजार चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आणि १0 लाख लोकांनी पाहिला, असा दावा निर्मात्यांनी केला आहे.
या चित्रपटाविरोधात करणी सेनेने पुकारलेल्या देशव्यापी बंदला गुजरातमध्ये फारसा प्रतिसाद लाभला नाही. गुजरातमधील काही मार्गांवर बससेवा बंद ठेवण्यात आली होती.
न्यायालयाचा अवमान-
पद्मावतच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असतानाही गुजरात, मध्य प्रदेश, हरयाणा, राजस्थान या राज्यांनी घेतलेली भूमिका आणि करणी सेनेचे आंदोलन यामुळे न्यायालयाचा अवमान झाला आहे, अशा याचिका तहसीन पुनावाला व अॅड. विनीत धांडा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. त्यावर २९ जानेवारीला सुनावणी आहे.
राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा व मध्य प्रदेशात करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ केली. हा चित्रपट पाहू नये, असे आवाहन रा. स्व. संघाच्या वायव्य विभागाचे प्रमुख भगवती प्रकाश यांनी केले. त्यामुळे या आंदोलनामागे भाजपा व संघ असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
मुंबईत शांतता : ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मुंबई पोलिसांनी गुरुवारी सिनेमागृहांबाहेर बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे मुंबईतील १४० स्क्रीनवर चित्रपटाचे शो शांततेत पार पडले. मुंबईत या चित्रपटाच्या तिकीटाचे दर ३०० ते २५०० रुपयांपर्यंत पोहोचले होते.
गुरगावमध्ये शाळेच्या बसवर करणी सेनेने जो हल्ला चढविला त्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुस्लीम, दलितांवर
हल्ले होताना शांत बसणारे लोक आता मुलांवर हल्ले करायला लागले असून आता मात्र गप्प राहणे परवडणार नाही, असे ते म्हणाले.