'पद्मावती' मार्च-एप्रिलआधी प्रदर्शित होणं अशक्य, सेन्सॉर बोर्ड इतिहासकाराचं पॅनेल स्थापण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 04:35 PM2017-12-21T16:35:54+5:302017-12-21T16:44:27+5:30
पद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहणाऱ्या संगळ्यांची निराशा करणारी ही बातमी आहे.
मुंबई- दिग्दर्शनक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या सिनेमावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. 1 डिसेंबर रोजी होणारं सिनेमाचं प्रदर्शिन पुढे ढकलल्यानंतर सिनेमा नेमका कधी प्रदर्शित होणार, याकडे बॉलिवूड तसंच चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. पद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहणाऱ्या संगळ्यांची निराशा करणारी ही बातमी आहे. पद्मावती सिनेमा मार्च महिन्याआधी प्रदर्शित होणं अशक्य असल्याचं समोर आलं आहे. पद्मावती सिनेमाचा अभ्यास करण्यासाठी सेन्सॉर बोर्ड लवकरच इतिहासाकारांचं पॅनेल गठीत करण्याच्या तयारीत आहे. पद्मावती हा सिनेमा ऐतिहासिक मुद्द्यांना धरून असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. याचाच अभ्यास करण्यासाठी हे पॅनेल तयार करण्यात आलं आहे. हिदुस्तान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
गुजरात निवडणुकीनंतर सिनेमाच्या प्रदर्शनाला ग्रीन सिग्नल मिळेल, अशी अपेक्षा सिनेमातील प्रत्येक कलाकाराला होती. पण सेन्सॉरच्या या निर्णयामुळे त्यांचीची निराशा झाली आहे. सेन्सॉर बोर्डातील सुत्रांच्या माहितीनुसार, पद्मावती सिनेमाने अनावश्यकपणे प्रकरण गुंतागुंतींचं करून घेतलं. सिनेमा इतिहासाला धरून असल्याचं सांगत स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. पण आता सिनेमातील काही बाबींची छाननी होईल, असं सेन्सॉर बोर्डातील सुत्रांनी सांगितलं आहे. सेन्सॉरकडे सिनेमा पाठविताना भरलेल्या फॉर्ममध्ये काही मुद्दे राहिल्याने सिनेमा पुन्हा निर्मात्यांकडे पाठविला होता. फॉर्ममधील 'सिनेमा काल्पनिक कि इतिहासावर आधारीत' असा कॉलम निर्मात्यांनी रिकामा सोडला होता, त्यामुळे पद्मावती पुन्हा पाठवण्यात आला.
सीबीएफसीमधील सुत्रांच्या माहितीनुसार, डिसेंबर महिना संपायला काही दिवसच शिल्लक राहिल्याने सिनेमाला आता जानेवारी महिन्यात प्रमाणपत्र मिळेल. पद्मावतीच्या आधी आलेले 40 सिनेमे प्रमाणपत्रासाठी रांगेत आहेत. वर्षअखेर असल्याने बोर्डातील अनेक सदस्य सुट्टीवर आहेत तर काही जण आजारी आहेत. इतिहासकारांचं पथक तर सोडा पण सिनेमे पाहण्यासाठी समितीतील सदस्यही नाहीत. त्यामुळे सिनेमाला जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यातही प्रमाणपत्र मिळणं कठीण आहे. त्यामुळेच सिनेमा प्रदर्शनासाठी निर्मात्यांना मार्च किंवा एप्रिलची वाट पाहावी लागेल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
पद्मावती सिनेमाच्या पोस्टर आणि नंतर ट्रेलर लॉन्चपासून वादाच्या भोवऱ्यात आहे. विविध राजपूत संघटनांनी भन्साळींच्या या भव्य सिनेमाला विरोध करत त्यात सहभागी कलाकारांना धमकावलंसुद्धा. राणी पद्मावती आणि राजपूत संस्कृती मलीन करत हा सिनेमा साकारण्यात आला असल्याचा आरोप अनेकांनी लावला.