पद्मावती चित्रपटाचे राजस्थानात प्रदर्शन नाही
By admin | Published: March 5, 2017 01:15 AM2017-03-05T01:15:04+5:302017-03-05T01:15:04+5:30
संजय लीला भन्साळी यांचा आगामी पद्मावती चित्रपट राजपूत समाजाच्या नेत्यांना दाखविला जाईपर्यंत तो राज्यात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही
जयपूर : संजय लीला भन्साळी यांचा आगामी पद्मावती चित्रपट राजपूत समाजाच्या नेत्यांना दाखविला जाईपर्यंत तो राज्यात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही ऊर्जामंत्री पुष्पेंद्र सिंह यांनी राजपूत समाजाला दिली. सवर्ण अधिकार आरक्षण मंचातर्फे निदर्शने करण्यात आली, तेव्हा ते बोलत होते.
राजस्थानात कर्णी सेनाचे सदस्य दीपिका पदुकोन, रणवीरसिंह आणि शाहिद कपूर यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाविरुद्ध निदर्शने करीत आहेत. चित्रपट निर्मात्याने इतिहासाचा विपर्यास केल्याचा त्यांचा आरोप आहे. जोपर्यंत आमच्या समाजबांधवांना हा चित्रपट दाखविला जात नाही तोपर्यंत तो राज्यात प्रदर्शित केला जाणार नाही, असे सिंह म्हणाले.
श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेना ही कर्णी सेनेचीच एक शाखा आहे. या चित्रपटाविरुद्धच्या निदर्शनांमुळे ही संघटना चर्चेत आली होती. राजपूत समाजाच्या एका संघटनेने जानेवारीत भन्साळी यांच्या राजस्थानातील सेटवर तोडफोड केली होती. यावेळी भन्साळी यांनाही धक्काबुक्की झाली होती. त्याबाबत चित्रपट उद्योगातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. या घटनेनंतर भन्साळी यांनी पद्मावतीचे राजस्थानातील चित्रीकरण थांबविले होते. (वृत्तसंस्था)
सवर्णांना आरक्षण हवे
पद्मावती चित्रपटावर राजस्थानात बंदी घालावी, राजपूत, ब्राह्मणांसह सवर्णातील इतर आर्थिक मागासांना आरक्षण द्यावे, राजपूत समुदायाचे सदस्य चतुरसिंह सोधा यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करावी आदी निदर्शकांच्या मागण्या होत्या. श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह यांनी या निदर्शनांचे नेतृत्व केले.