Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:09 IST2025-04-23T15:08:29+5:302025-04-23T15:09:03+5:30
Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे.

Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे आणि प्रत्येकजण दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी करत आहे. दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये येणाऱ्या पर्यटकांना त्यांचं नाव आणि धर्म विचारून टार्गेट केलं आहे. येथे एकूण २६ जणांचा मृत्यू झाला. शैलेश कलठिया यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. ते त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबासह काश्मीरला आले होते. पण हा वाढदिवस त्यांचा शेवटचा वाढदिवस ठरला.
शैलेश हे मूळचे अमरेलीचे होते आणि त्यांचं कुटुंब सूरतमध्ये राहत होतं. बँकेच्या नोकरीमुळे गेल्या एक वर्षापासून मुंबईत राहत होते. ४४ वर्षीय शैलेश त्यांची पत्नी शीतल, मुलगी नीती आणि मुलगा नक्षत्र यांच्यासोबत काश्मीरला गेले होते. पण मंगळवारी पहलगाममध्ये फिरत असताना असं काही घडलं ज्यामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पहलगाममध्ये घोडेस्वारीचा आनंद घेत असताना हा दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात शैलेश यांना गोळी लागली. त्यांची पत्नी आणि मुलं सुरक्षित आहेत.
शैलेश यांच्या व्यतिरिक्त गुजरातमधील यतीशभाई परमार, त्यांची पत्नी काजलबेन आणि मुलगा स्मित हे भावनगरहून काश्मीरला आले होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. नंतर काजलबेन सुरक्षित आहेत. मात्र यतिशभाई आणि मुलगा स्मित यांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर दोघे जखमी आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गुजरात सरकार केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर सरकारच्या संपर्कात आहे.
"इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरेही जम्मू काश्मीरमध्ये कुटुंबीयांसोबत पर्यटनाला गेल्या होत्या, त्या अडकल्या आहेत. रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक व्हिडीओ शेअर करून तेथील भयावह परिस्थिती सांगितली आहे. तसेच सरकारला विनंती केली आहे. "मी माझ्या सर्व कुटुंबासह श्रीनगर जम्मू काश्मीरला फिरायला आले होते. आजचा हल्ला झाल्यानंतर इथले सर्वजण प्रचंड घाबरलेले आहेत. काही पर्यटक आजच आलेले आहेत. काहींच्या परवा आणि त्यानंतरच्या फ्लाइट्स आहेत.त्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना विनंती आहे की, इथे जे पर्यटक अडकून पडले आहेत त्यांना तात्काळ येण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी. कारण इथे प्रचंड घबराट पसरली आहे" असं म्हटलं आहे.