"आम्ही कुठे जायला घाबरत नाही"; दहशतवादाला पर्यटनाने उत्तर देण्यासाठी मनसे कार्यकर्ते जाणार काश्मीरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:52 IST2025-04-24T15:47:39+5:302025-04-24T15:52:07+5:30

पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दहशतवादाला पर्यटनाने उत्तर देणार असल्याचे म्हटले.

Pahalgam Attack MNS party worker will soon go to Kashmir will respond to terrorism with tourism | "आम्ही कुठे जायला घाबरत नाही"; दहशतवादाला पर्यटनाने उत्तर देण्यासाठी मनसे कार्यकर्ते जाणार काश्मीरला

"आम्ही कुठे जायला घाबरत नाही"; दहशतवादाला पर्यटनाने उत्तर देण्यासाठी मनसे कार्यकर्ते जाणार काश्मीरला

MNS Sandeep Deshpande on Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार करुन २६ जणांचे प्राण घेतले. दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारावर वेगळं केले आणि त्यानंतर हिंदू पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. दहशतावाद्यांनी केवळ पुरुषांनाच टार्गेट केले आणि त्यांचे प्राण घेतले. त्यामुळे तिथे अडकलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. अनेक पर्यटकांनी काश्मीर सोडलं तर अनेकांनी जाण्याच्या आखलेल्या योजना रद्द केल्या आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये पर्यटनाला मोठा फटका बसला असून तिथले लोक बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दहशतवादाला पर्यटनाने उत्तर देण्याचे ठरवले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधल्या पर्यटनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केल्याने काश्मीरला जाऊ इच्छिणाऱ्यांमध्ये आता दहशतीचे वातावरण आहे. अनेकांनी काश्मीरला जाण्याच्या योजना रद्द केल्या आहेत. त्यामुळे तिथल्या पर्यटन व्यवसायाचे जबर नुकसान झाले आहे. अशातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे कार्यकर्ते काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जाणार असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली.

"आता वेळ आलेली आहे सर्वांनी एकत्रितपणे या दहशतवादी हल्ल्याला तोंड देणे गरजेचे आहे. या दहशतवाद्यांना नागरिक म्हणून आपण उत्तर दिलं पाहिजे. दहशतवादाचे उत्तर काश्मीरचे पर्यटन आहे. काश्मीरचे लोक बेरोजगार झाले पाहिजेत हेच दहशतवाद्यांचे उद्दिष्ट आहे. जेणेकरुन ते पुन्हा दहशतवादाकडे वळतील. हा डाव उधळून लावायचा असेल तर देशभरातील लोकांनी जेवढे शक्य होईल तेवढे काश्मीरचे पर्यटन केले पाहिजे. त्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत. दहशतवादाला उत्तर आम्ही पर्यटनाने देणार आहोत. काश्मीरमधील परिस्थिती आम्ही बिघडू देणार नाही," असे संदीप देशपांडे यांनी म्हटलं.

"काश्मीरमध्ये पर्यटक जिथे जातात तिथे आम्ही जाणार आहोत. आम्ही काय कुठे जायला घाबरत नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भारतात कुठेही जायला भीती नाही वाटली पाहिजे हाच संदेश यातून द्यायचा आहे," असेही संदीप देशपांडे यांनी सांगितले.  

Web Title: Pahalgam Attack MNS party worker will soon go to Kashmir will respond to terrorism with tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.