VIDEO: "आम्हाला जीवाची पर्वा नव्हती कारण लोक..."; पर्यटकाला वाचवण्यासाठी पाठीवर घेऊन धावला सज्जाद भट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 14:46 IST2025-04-24T14:34:07+5:302025-04-24T14:46:01+5:30
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मिरी तरुणांनी पर्यटकांना मोठा धीर देत त्यांना योग्य ती मदत पुरवली

VIDEO: "आम्हाला जीवाची पर्वा नव्हती कारण लोक..."; पर्यटकाला वाचवण्यासाठी पाठीवर घेऊन धावला सज्जाद भट
Pahalgam Attack: मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये २५ भारतीय आणि एका नागरिकाचा समावेश आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर घाबरलेल्या पर्यटकांना सांभाळण्यासाठी काश्मिरी लोक पोहोचले होते. त्यांनी पर्यटकांना धीर दिला. हल्ल्याची माहिती मिळताच काश्मीरमधील लोक पर्यटकांच्या मदतीसाठी पुढे आले. काश्मिरी लोकांनी पर्यटकांना त्यांच्या घरात आश्रय दिला. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एक काश्मिरी तरुण एका जखमी पर्यटकाला पाठीवर घेऊन धावताना दिसत आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना लक्ष्य केले. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला. दहशतवाद्यांनी केवळ पुरुषांनाच टार्गेट केले. ओळख पटवल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. दहशतवाद्यांनी सहा पुरुषांची तर त्यांच्या पत्नीसमोरच निर्घृणपणे हत्या केली. त्यामुळे अनेक कुटुंबे उद्धवस्त झाली आहेत. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पहलगाम येथील शाल विक्रेता सज्जाद अहमद भट एका जखमी पर्यटकला खांद्यावर घेऊन सुरक्षित ठिकाणी घेऊन जाताना दिसत आहे. सज्जाद अहमद भटच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सज्जाद एका जखमी मुलाला पाठीवर घेऊन धावताना दिसत आहे. या घटनेनंतर सज्जादने सांगितले की, आधी माणुसकी आहे मग धर्म येतो.
"पहलगाम पोनी असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल वाहिद वान यांनी आमच्या गटाला बैसरन व्हॅलीमध्ये घडलेल्या घटनेबद्दल मेसेज पाठवला होता. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलो आणि दुपारी ३ च्या सुमारास त्या ठिकाणी पोहोचलो. आम्ही तिथल्या जखमींना पाणी दिले आणि ज्यांना चालता येत नव्हते त्यांना उचलून घेतले. पर्यटकांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे, कारण ते पाहुणे आहेत आणि आमचं घर त्यांच्यावर अवलंबून आहे. माझ्यासाठी धर्माच्या आधी माणुसकी येते. आम्ही त्यापैकी अनेकांना रुग्णालयात आणले. आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नव्हती कारण आम्ही तिथे गेलो तेव्हा लोक मदतीसाठी याचना करत होते. पर्यटकांना रडताना पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले. त्यांच्या इथे येण्यानेच आमच्या घरातील चूल पेटते. धर्माच्या आधी माणुसकी पाहिली पाहिजे. तु्म्हाला आम्हाला एकटे सोडू नका. तुम्ही आमचे भाऊ आहात. त्यांच्याशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे," असे सज्जाद अहमद भटने सांगितले.
दरम्यान, या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये बोलताना दहशतवाद्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. "ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या दहशतवाद्यांना आणि हा कट रचणाऱ्यांना त्यांना कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा जास्त कठोर शिक्षा दिली जाईल. शिक्षा मिळूनच राहणार. आता उरलेल्या दहशतवाद्यांनाही मातीत गाडण्याची वेळ आली असून त्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांच्या प्रमुखांचे कंबरडे मोडून ठेवणार आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.