Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 09:17 IST2025-04-23T09:16:44+5:302025-04-23T09:17:22+5:30
जर आम्ही दोन मिनिटेही वाट पाहिली असती तर कदाचित आम्ही इथे पोहोचलो नसतो, असेही तिने सांगितले.

Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
पहलगाम - पहलगामच्या बैसरन घाटीत सोमवारची संध्याकाळ अचानक दहशतीत बदलली. पर्यटक मिनी स्वीत्झर्लंडमधून बाहेर येताच २० फूट अंतरावरून गोळीबार सुरू झाला; पण कोणीही गोळीबार करताना दिसले नाही. लोक एकमेकांवर पडून आणि चिरडून लोक फक्त चार फूट रुंद दरवाजातून जंगलाकडे धावत होते.
तिलक रूपचंदानी यांच्या पत्नीने जीव वाचवण्यासाठी टेकडीवरून उडी मारली आणि तिचे दोन्ही पाय फ्रैक्चर झाले. तिलक रूपचंदानी म्हणाले की, बराच वेळ गोळ्यांचा आवाज ऐकू येत होता; पण मागे वळण्याची हिंमत कोणातच झाली नाही. त्यांच्या पत्नीने सांगितले की, गर्दीत त्यांना शोधण्यासाठी कोणाकडेही वेळ नव्हता. चार-पाच हजार लोक देवाचे नाव घेत पुढे जात राहिले. जर आम्ही दोन मिनिटेही वाट पाहिली असती तर कदाचित आम्ही इथे पोहोचलो नसतो, असेही तिने सांगितले.
हिंदू नाव ऐकताच गोळीबार
हल्लेखोरांनी प्रथम नाव विचारले आणि हिंदू नाव ऐकताच त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनी परिसराला वेढा घातला आहे आणि शोधमोहीम सुरू केली आहे. जखमींवर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. त्यात अनेक लोक रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर निपचित पडले आहेत. तसेच महिला पर्यटक हंबरडा फोडत त्यांच्या आप्तजनांचा शोध घेताना दिसत होते. काही पर्यटक या हल्ल्यामुळे खूप हादरले होते व स्थानिक नागरिक त्यांना सावरण्याचा प्रयत्न करीत होते.
हल्ल्याची बातमी कळताच पहलगामचे रस्ते ओस पडले
दहशतवादी हल्ल्याची बातमी कळताच पहलगाममधील रस्ते ओस पडले. मोठ्या संख्येने तिथे आलेले पर्यटक सुरक्षितस्थळी रवाना झाले. २००० मध्ये अमरनाथ बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३० पेक्षा अधिक जण ठार, ६० जण जखमी झाले. त्यानंतर २००१ मध्ये शेषनाग येथे १३ जण ठार, १५ जखमी आणि २००२ मध्ये पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला. २०१७ मध्ये अमरनाथ यात्रेतून परतणाऱ्या ८ यात्रेकरूंवर गोळीबार करण्यात आला.
अनेक पर्यटक जमिनीवर पडले रक्ताच्या थारोळ्यात
हल्ला झाल्यानंतर जखमी झालेल्यांनी व त्यांच्या नातेवाइकांनी मदतीसाठी हंबरडा फोडल्याचे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते. काही पर्यटक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अतिशय क्रूर पद्धतीने हा हल्ला करण्यात आला.. जंगलातून काही दहशतवादी आले व त्यांनी ४० पर्यटकांना घेराव घालून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबाराला सुरुवात होताच येथील स्थानिकांनी जीव वाचविण्यासाठी तिथून पलायन केले. मात्र, पर्यटकांना तिथून निसटणे शक्य झाले नाही. या गोळीबारातून बचावलेल्या एका महिलेने सांगितले की, माझ्या नवऱ्याच्या डोक्याला गोळी लागली आहे. तो विशिष्ट धर्माचा असल्यामुळे त्याच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.
३ जुलैपासूनच्या अमरनाथ यात्रेत हवी कडक सुरक्षा
काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी हा भीषण हल्ला झाला. येत्या ३ जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार असून, ती ३८ दिवस चालणार आहे. पहलगाम येथील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्याची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.