पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:53 IST2025-04-23T15:52:52+5:302025-04-23T15:53:04+5:30
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. गेल्या 24 तासांत ज्या घडामोडी घडल्या आहेत, त्यामुळे हा संशय बळावला आहे. असे म्हटले जात आहे की, भारत पूर्वीप्रमाणेच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सीमापार मोठी मोहीम राबवू शकतो. 2016 आणि 2019 मध्ये दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केले. दोन्ही सर्जिकल स्ट्राईकमध्ये 500 हून अधिक पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले होते.
पाकिस्तानवर कारवाईचे 4 संकेत
1. गृहमंत्री शाह यांची उच्चस्तरीय बैठक
दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाहा तात्काळ काश्मीर खोऱ्यात पोहोचले. शाह स्वतः या संपूर्ण प्रकरणावर जातीने लक्ष ठेवत असून, घटनास्थळांना भेटी देत आहेत. काश्मीरमध्ये शाहांनी एलजी मनोज सिन्हा आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. बैठकीनंतर शाह म्हणाले की, कोणत्याही दहशतवाद्याला सोडले जाणार नाही. हा देश दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही.
2. पंतप्रधान मोदी दुसऱ्या मार्गाने आले
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात होते. मोदींनी त्यांचा तिथला दौरा रद्द केला आणि लगेच भारतात परतले. अहवालानुसार पंतप्रधान पाकिस्तानच्या हवाई हद्दीऐवजी दुसऱ्या मार्गाने दिल्लीला आले. मोदींच्या या पावलाकडे पाकिस्तानला थेट इशारा म्हणून पाहिले जात आहे. पंतप्रधान दिल्लीत सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक घेतील. सुरक्षाविषयक कॅबिनेट समिती ही सर्वोच्च पातळीची समिती आहे. यामध्ये सुरक्षेशी संबंधित प्रमुख निर्णय घेतले जातात.
3. तिन्ही दल सज्ज, संरक्षणमंत्र्यांनी घेतली बैठक
पहलगाम घटनेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत तिन्ही लष्कर प्रमुखांना सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. याचाच अर्थ सरकार एखाद्या मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे. गेल्या वेळी हवाई दलाने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता.
4. पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण
पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. जर भारताने हल्ला केला तर येथील सर्व पक्ष एकत्रितपणे त्याचा विरोध करतील, असे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे. फवाद यांच्या आधी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या हल्ल्यात पाकिस्तानचा कोणताही सहभाग नसल्याचे म्हटले. सॅटेलाईट रिपोर्टनुसार, कालच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाची विमाने रात्रभर पाकिस्तान सीमेभोवती गस्त घालत होती.