पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 21:12 IST2025-04-23T21:11:42+5:302025-04-23T21:12:11+5:30
Pahalgam Terrot Attack : सुरक्षा यंत्रणांनी काश्मीर खोऱ्यात कारवाई सुरू केली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
Pahalgam Terrot Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये कारवाई सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात 1500 हून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या लोकांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आणि संवेदनशील भागातून पकडण्यात आले आहे.
यामध्ये ओव्हरग्राउंड वर्कर्स (OGW), माजी दहशतवादी आणि ज्यांच्याविरुद्ध आधीच एफआयआर दाखल झाले आहेत किंवा ज्यांची नावे गुप्तचर यंत्रणेच्या वॉच लिस्टमध्ये आहेत, अशा सर्वांचा समावेश आहे. हल्लेखोरांना आश्रय देणाऱ्यांचा शोधही तपास यंत्रणा घेत आहेत. संपूर्ण परिसरात शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
या कारवाईद्वारे हल्ल्यामागील नेटवर्क आणि स्लीपर सेल्सचा शोध घेतला जातोय. हल्लेखोरांना कोणी आश्रय दिला, मदत केली किंवा शस्त्रे पुरवली हे शोधण्यासाठी सध्या या सर्व लोकांची कठोर चौकशी केली जात आहे. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वेही तयार केली जात आहेत. संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केली जात आहे.
राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर विशेष देखरेख ठेवली जात आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की दहशतवादाविरुद्धची ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, कोणतेही षड्यंत्र यशस्वी होऊ दिले जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक सुरू आहे, ज्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि इतर वरिष्ठ मंत्री उपस्थित आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की, केंद्र सरकार नागरिकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी वचनबद्ध आहे आणि दहशतवादाचे जाळे उखडून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
टीआरएफने हल्ल्याची जबाबदारी घेतली
टीआरएफच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून प्रशिक्षण आणि निधी मिळत असल्याचा आरोप सतत केला जात आहे. टीआरएफने खोऱ्यात रक्तपात घडवून आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही या संघटनेने अनेक मोठे दहशतवादी हल्ले केले आहेत. टीआरएफ हा लष्कर-ए-तैयबाचा एक नवीन चेहरा मानला जातो, ज्याला आंतरराष्ट्रीय दबावापासून वाचण्यासाठी पाकिस्तानने 'स्थानिक काश्मिरी चळवळ' म्हणून चित्रित केले आहे.