काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 08:10 IST2025-04-24T08:10:35+5:302025-04-24T08:10:54+5:30
केंद्रीय प्लास्टिक इंजिनिअरिंग व तंत्रज्ञान संस्थेत लेखा सहायक म्हणून काम करणारे प्रशांत (४०) पर्यटनासाठी गेले होते.

काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला
जम्मू : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील व्यावसायिक दिनेश मिरानिया हे लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पहलगामला गेले होते. तेव्हा अतिरेक्यांनी पत्नी व दोन मुलांसमोर त्यांची हत्या केली. लग्नाचा वाढदिवस व धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे कुटुंबीय प्रदीर्घ काळापासून काश्मिरात जाण्याचा विचार करत होते. परंतु आता संपूर्ण कुटुंबीय दिनेश यांच्या मृतदेहाची प्रतीक्षा करत आहे, हे दुर्दैव आहे. भाजपचे नेते व मिरानिया कुटुंबाचे नातेवाईक अमर बन्सल म्हणाले की, दिनेश हे माझ्या साडूचे भाऊ होते. त्यांना गोळी मारल्याची माहिती मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजता आम्हाला मिळाली परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे रात्री कळाले.
अनेक महिने पैसे साठवून पत्नी व मुलासह काश्मीरला गेले अन् झाली हत्या
हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले प्रशांत सत्पथी यांनी अनेक महिने आधीपासून पैसे साठवले होते. त्यानंतर ते पत्नी व ९ वर्षांच्या मुलासह काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. प्रशांत यांचे मोठे बंधू सुशांत यांनी सांगितले की, त्याने अनेक महिने पैसे साठवले होते. केंद्रीय प्लास्टिक इंजिनिअरिंग व तंत्रज्ञान संस्थेत लेखा सहायक म्हणून काम करणारे प्रशांत (४०) पर्यटनासाठी गेले होते. त्यांची पत्नी प्रियदर्शिनी आचार्या हिने सांगितले की, आम्ही रोपवेमधून उतरत असताना प्रशांत यांच्या डोक्याला गोळी लागली.
सुजाता यांनी पतीला गोळी लागून मरताना पाहिले... मुलगा केवळ तीन वर्षांचा
पहलगाम येथे बंगळुरूमधील भारत भूषण हे पत्नी सुजाता व तीन वर्षीय मुलासह गेले होते. यातील भारत भूषण यांची दहशतवाद्यांनी गोळी मारून हत्या केली. यात सुजाता व त्यांचा मुलगा वाचला. सुजाता यांच्या मातोश्री विमला यांनी सांगितले की, भारत भूषण यांची पत्नी व मुलासमोर हत्या करण्यात आली. हल्ल्यात जीव गमावणारे अन्य एक व्यक्ती मंजूनाथ राव यांची बहीण रूपा हिने शिवमोगा येथे सांगितले की, त्यांचे कुटुंबीय प्रथमच
राज्याबाहेर पर्यटनासाठी गेले होते.