कॅमेरा असलेले हेल्मेट, हलकी एम४ कार्बाइन रायफल अन्...; पहलगाम हल्ल्याबाबत धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:42 IST2025-04-23T16:17:29+5:302025-04-23T16:42:36+5:30
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात दोन दहशतवादी पाकिस्तानातून आल्याची माहिती समोर आली आहे.

कॅमेरा असलेले हेल्मेट, हलकी एम४ कार्बाइन रायफल अन्...; पहलगाम हल्ल्याबाबत धक्कादायक माहिती उघड
Pahalgam Attack preliminary investigation: मंगळवारी पहलगाममधील बैसरन येथे भीषण असा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी तिथे असलेल्या पर्यटकांवर हल्ला करुन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या पोलिसांच्या वेशात असलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना नाव विचारुन त्यांची निर्घृणपणे हत्या केली. ज्यामध्ये तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून डझनभराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये देशभरातील पर्यटकांचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा एक फोटो समोर आला असून, या दहशतवाद्यांपैकी दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक असल्याचे उघड झाले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सुरुवातीच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या दहशतवाद्यांनी हेल्मेट घातले होते. त्या हेल्मेटमध्ये कॅमेरे बसवले होते ज्याद्वारे त्यांनी संपूर्ण घटनेचे व्हिडिओ शूटिंग केले. दहशतवाद्यांनी अमेरिकेत बनवलेल्या एम४ कार्बाइन रायफल्स आणि एके-४७ मधून गोळीबार केला. तीन दहशतवाद्यांनी बंदुकीच्या धाकावर पर्यटकांना ओलीस धरलं आणि नंतर सर्व महिला आणि मुलांना बाजूला केलं. मग दहशतवाद्यांनी पुरुषांची ओळख पटवून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
दहशतवाद्यांनी काही पळालेल्या पुरुषांवर दूरवरून गोळ्या चालवल्या. हा हल्ला सुमारे २०-२५ मिनिटे सुरु होता. जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. ज्या भागात हल्ला झाला तिथे वाहनांना परवानगी नाही. पर्यटक घोड्याने किंवा इतर मार्गांनी त्या ठिकाणी पोहोचू शकतात. त्यामुळे जाणीवपूर्वक हे ठिकाण निवडले गेले असावे. कारण दहशतवाद्यांना माहित होते की मदत पोहोचण्यासठी वेळ लागेल आणि त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढेल.
हल्ल्यानंतर घटनास्थळावरून सुमारे ५०-७० वापरलेली काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने अनेक प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत. या दहशतवाद्यांनी किश्तवाड येथून सीमा ओलांडून पहलगाममध्ये प्रवेश केला. स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने ते कोकरनाग मार्गे बेसरणला पोहोचला. हे दोन दहशतवादी एम४ कार्बाइन रायफल घेऊन आले होते. तर इतर दोघांकडे एके-४७ होती.