पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:36 IST2025-04-23T15:31:39+5:302025-04-23T15:36:10+5:30
Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशासह जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेच. उल्लेखनीय बाब म्हणजे या हल्ल्यानंतर काश्मीरमधूनही नेहमीपेक्षा वेगळीच प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी केलेल्या हल्ल्यात २६ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश जण हे भारताच्या विविध भागातील पर्यटक आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर देशासह जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेच. उल्लेखनीय बाब म्हणजे या हल्ल्यानंतर काश्मीरमधूनही नेहमीपेक्षा वेगळीच प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.
काश्मीर खोऱ्यात मागच्या काही वर्षांमध्ये झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यामधील जनता दहशतवादी हल्ल्याविरोधात उघडपणे आवाज उठवताना दिसत आहे. पहलगामसह काश्मीरमधील बहुतांश भागांमधून या दहशतवादी कारवाईचा निषेध केला जात आहे. काश्मीरमधील जनता पहिल्यांदाच दहशतवादी कारवाईविरोधात उघडपणे बोलताना दिसत आहे. एवढंच नाही तर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची या हल्ल्याविरोधात एकजूट झाली आहे. तसेच फुटीरतावादी हुर्रियतच्या गटांनीही दहशतवादी हल्ल्याविरोधात काश्मीर खोऱ्यामध्ये बंदचं आवाहन केलं आहे.
या दहशतवादी हल्ल्याविरोधात पहलगामपासून श्रीनगरपर्यंत दुकानं आणि पेट्रोल पंप बंद असल्याचे दिसत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या ३५ वर्षांमध्ये पहिल्यांदात दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीर खोऱ्यात बंदचं आवाहन केलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधून उमटलेली प्रतिक्रिया थोडी वेगळी भासत असून, त्यात काही गोष्टी पहिल्यांदाच दिसून आल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे.
-पहलगाम हल्ल्याविरोधात काश्मीर खोऱ्यात पुकारण्यात आलेल्या बंदला सर्वसामान्यांसह विविध राजकीय पक्ष, धार्मिक आणि व्यापारी संघटना तसेच फुटीरतावादी संघटना आणि नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे.
-धार्मिस गटांची संघटना मुत्तादिहा मजलिस उलेमा हिनेही बंदचं आवाहन केलं आहे. तर फुटीरतावादी नेते मीरवाईज उमर फारुख यांनी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रति शोक व्यक्त केला आहे.
- पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या मदतीसाठी स्थानिकांकडून मदतीचा हात पुढे येत आहे. तसेच एरवी लवकर बंद होणारे पहलगाममधील टॅक्सी स्टँड रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
-काश्मीर खोऱ्यामधील अनेक प्रमुख वृत्तपत्रांनी आपलं पहिलं पान काळ्या रंगात छापून या घटनेचा निषेध केला आहे.