"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 00:48 IST2025-04-25T00:47:35+5:302025-04-25T00:48:23+5:30
"ही लढाई धर्म आणि अधर्माची आहे," असे भागवत यांनी म्हटले आहे.

"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
जम्मू-काश्मिरातील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. देशवासीयांना दहशतवाद्यांचा समूळ विनाश हवा आहे. या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. महत्वाचे म्हणजे, त्या कट्टरपंथी दहशतवाद्यांनी धर्म विचारून, कलमा पढायला सांगून, या निष्पाप पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यासंदर्भात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही भाष्य केले आहे. "ही लढाई धर्म आणि अधर्माची आहे," असे भागवत यांनी म्हटले आहे. ते सोमवारी मुंबई येथे आयोजित पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या 83व्या पुण्यतिथी कार्यक्रमावेळी बोलत होते.
भागवत म्हणाले, "ही लढाई धर्म आणि अधर्माची आहे. ज्या लोकांना मारले गेले, त्यांना आधी त्यांचा धर्म विचारला गेला. हिंदू असे कधीही करणार नाही. कारण तो धैर्यवान आहे. देश मजबूत व्हायला हवा." याच बरोबर, "अशा राक्षसांचा सर्वनाश करण्यासाठी भारत सशक्त बनवावा लागेल, असे आवाहनही त्यांनी देशवासीयांना केले. "देश मजबूत बनवावा लागेल. आपल्या अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा," असेही भागवत यावेळी म्हणाले.
कुठे झाली नेमकी चूक? सरकारनं सांगितलं -
या घटनेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीतील सर्व पक्षांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. यावेळी सरकारने सुरक्षेत चूक झाल्याचे मान्य केले.
सैन्य का तैनात नव्हते?
बैठकीत विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केला की, ज्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक आले होते, तिथे सैन्य किंवा सुरक्षा का तैनात नव्हती? तसेच, गुप्तचर संस्था काय करत होत्या? बहुतांश पक्षांनी गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी आणि तेथे योग्य सुरक्षा तैनातीचा मुद्दा उपस्थित केला. यावर सरकारने सांगितले की, साधारणपणे जून महिन्यात अमरनाथ यात्रा सुरू होते, अमरनाथ यात्रेचे यात्रेकरू या ठिकाणी विश्रांती घेतात, तेव्हाच हा मार्ग उघडला जातो आणि या भागात सैन्य तैनात करण्यात येते. पण, यंदा स्थानिक टूर ऑपरेटर्सनी खूप लवकर सरकारला न कळवता पर्यटकांचे बुकिंग घेण्यास सुरुवात केली, त्यामुळेच 20 एप्रिलपासून पर्यटकांनी तिथे येणे सुरू केले. स्थानिक अधिकाऱ्यांनाही याची माहिती नव्हती आणि त्यामुळे तिथे सैन्याची तैनाती करण्यात आली नाही, अशी माहिती सरकारने दिली.