स्थलांतरित मजुरांच्या वेदना शब्दातीत; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 06:43 AM2020-06-01T06:43:56+5:302020-06-01T06:44:16+5:30
कोरोना विषाणूविरोधातील आमचा संघर्ष हा दीर्घ काळ चालणारा आहे. ही आपत्ती, या अरिष्टावर संपूर्ण जगात नेमका उपाय उपलब्ध नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या उद्रेकाने गरीब आणि मजुरांना मोठा फटका बसला असून त्यांच्या वेदना शब्दांत सांगता येणाऱ्या नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
मोदी त्यांच्या दर महिन्याच्या ‘मन की बात’ या रेडिओवरील कार्यक्रमात रविवारी म्हणाले की, ‘‘कोविड-१९ महामारीचा फटका सगळ्या थरांतील लोकांना बसला; परंतु गरीब त्यात कमालीचे भरडून निघाले. आमची खेडी, गावे, जिल्हे आणि राज्ये स्वावलंबी असती तर आज आम्ही ज्या प्रमाणात प्रश्नांना तोंड देत आहोत तेवढी वेळ आली नसती.’’ गरीब, मजुरांना मदत करण्यासाठी प्रत्येक जण काम करीत आहे, असे सांगून मोदी यांनी रेल्वेने स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचे जे काम केले त्याचा आवर्जून उल्लेख केला.
कोरोना विषाणूविरोधातील आमचा संघर्ष हा दीर्घ काळ चालणारा आहे. ही आपत्ती, या अरिष्टावर संपूर्ण जगात नेमका उपाय उपलब्ध नाही. या अरिष्टाचा यापूर्वी अनुभवही नाही. आम्ही अगदीच नव्या आव्हानांना आणि त्यातून येणाºया कठीण स्थितीला तोंड देत आहोत, असे मोदी म्हणाले. सगळे देश कोरोना विषाणूमुळे ज्या प्रश्नांना तोंड देत आहेत तसेच भारताबाबतही आहे. देशातील एकही भाग असा नाही की ज्याला कोरोनामुळे त्रास झाला नाही. हा त्रास खूप खोलवर झाला तो कोणतेही संरक्षण नसलेले मजूर आणि कामगारांना. त्यांचे दु:ख, त्यांच्या वेदना, त्यांनी भोगलेली कठीण परिस्थिती ही शब्दांत सांगता येणारी नाही. हे मजूर, कामगार आणि त्यांचे कुटुंबीय आज जे भोगत आहेत ते आम्ही समजून घेऊ शकणार नाही, असे मोदी म्हणाले.
मला सेवा करण्याची संधी या देशाने दिल्यापासून आम्ही पूर्व भारताच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. गेल्या काही वर्षांत याबाबत बरेच काम झाले आहे व त्याचे मला खूप समाधान आहे आणि आता स्थलांतरित कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी नव्या उत्तराची गरज आहे आम्ही त्या दिशेने अथकपणे काम करीत आहोत, असे मोदी म्हणाले.
मजूर, कामगारांमधील कौशल्येही शोधली जात असल्याचे ते म्हणाले.