हाथरस प्रकरणामुळे दुखावलेल्या वाल्मिकी समाजाच्या ५० कुटुंबांनी स्वीकारला बौद्ध धर्म
By कुणाल गवाणकर | Published: October 22, 2020 02:52 PM2020-10-22T14:52:55+5:302020-10-22T14:55:16+5:30
hathras case: सातत्यानं दुर्लक्ष केलं जात असल्यानं वाल्मिकी समाजातल्या कुटुंबाचा निर्णय
गाझियाबाद: संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. या घटनेचे तीव्र सामाजिक पडसाद उत्तर प्रदेशात पाहायला मिळत आहेत. गाझियाबादमधल्या करहेडामधल्या वाल्मिकी समाजातल्या ५० कुटुंबांनी धर्मांतर केलं आहे. एकूण २३६ जणांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकरांच्या उपस्थितीत त्यांनी बौद्ध धर्माची दिक्षा घेतली.
हाथरस प्रकरणामुळे अतिशय दु:ख झाल्याची भावना बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या वाल्किमी कुटुंबांनी व्यक्त केली. 'आमच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं जात आहे. आर्थिक विवंचनेचा सामना करत असूनही प्रकरणांची सुनावणी घेतली जात नाही,' अशी व्यथा बौद्ध धर्माचा स्वीकार करणाऱ्या कुटुंबीयांनी मांडली. या कुटुंबांना भारतीय बौद्ध महासभेकडून एक प्रमाणपत्र देण्यात आलं.
आमच्या गावातल्या ५० कुटुंबांमधल्या २३६ जणांनी बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्याचं बीर सिंह यांनी सांगितलं. 'बौद्ध धर्म स्वीकारण्यांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे. त्यांनी यासाठी कोणतंही शुल्क घेतलेलं नाही. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर समाजसेवा करा, असं त्यांनी सांगितलं,' अशी माहिती सिंह यांनी दिली.
१४ सप्टेंबरला हाथरसमधील बुलगढी गावातल्या वाल्मिकी समाजाच्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. या मुलीची जीभही कापून टाकण्यात आली. रुग्णालयात कित्येक दिवस पीडितेवर उपचार सुरू होते. मात्र तिची झुंज अपयशी ठरली. यानंतर वाल्मिकी समाजात आक्रोश पाहायला मिळाला. सध्या सीबीआयकडून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चारही आरोपी अलिगढमधील तुरुंगात आहेत.