पाक कलाकारांना भारतात 'एन्ट्री' कायम
By admin | Published: October 15, 2016 11:56 AM2016-10-15T11:56:18+5:302016-10-15T12:01:32+5:30
पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी मंजूर केलेला व्हिसा रद्द करण्याचा कोणताही निर्णय अद्याप तरी घेण्यात आलेला नाही, अशी माहिती गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.15 - 'पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी मंजूर केलेला व्हिसा रद्द करण्याचा कोणताही निर्णय अद्याप तरी घेण्यात आलेला नाही', अशी माहिती गृहमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका-यांनी दिली आहे. उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिक ताणले गेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र पाकिस्तानी कलाकारांना मंजूर केलेला व्हिसा रद्द करण्याची केंद्र सरकारची सध्या कोणतीही योजना नाही, अशी माहिती समोर येत आहे.
उरी दहशतवादी हल्ल्याबाबत संताप व्यक्त करत 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'नेही पाकिस्तानी कलाकारांना ताबडतोड भारत सोडण्याचा इशारा दिला होता. तसेच 'पाकिस्तानी कलाकार असलेला एकही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही', अशी ठाम भूमिकाही मांडली. दरम्यान 'इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युर्स असोसिएशन'नेही (इम्पा) पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे बॉलिवूडमधील काही जणांनी समर्थन केले आहे. मात्र, या निर्णयामुळे करण जोहरचा 'ए दिल है मुश्किल', शाहरुखचा 'रईस' सिनेमा अडचणीत सापडले आहेत. कारण सिनेमांमध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि माहिरा खानचा समावेश आहे. पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यामुळे सिनेमांच्या प्रदर्शनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आणखी बातम्या
18 सप्टेंबर रोजी उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यात 20 जवान शहीद झाले. याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने 27 आणि 28 सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानचे सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भारताने वारंवार दहशतवादी हल्ला करणा-या पाकिस्तानला अद्दल घडवायचे ठरवले आहे, त्यासाठी पाकिस्तानची जागतिक पातळीवर कोंडी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.