पाकच्या विमानांना पिटाळून लावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 05:31 AM2019-02-28T05:31:14+5:302019-02-28T05:31:28+5:30
भारतात घुसली होती तीन विमाने । एक त्यांच्याच भूमीत पाडले; प्रतिहल्ल्यावेही हवाई लढाईत भारताने गमावले मिग-२१ हे विमान
नवी दिल्ली : भारतीय हद्दीत बुधवारी सकाळी घुसून हल्ला करू पाहणाऱ्या पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांना भारताने चोख उत्तर देत पिटाळून लावले आणि पाकिस्तानचे एफ-१६ विमान त्यांच्याच हद्दीत पाडले. त्यानंतर, अन्य पाकिस्तानी विमाने निघून गेली. मात्र, पाकिस्तानचे विमान पाडताना मिग-२१ हे विमान भारताने गमावले असून, त्याचा वैमानिक बेपत्ता असल्याचे भारताचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले. त्यानंतर, त्याच्या सुटकेची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली. मात्र, सकाळच्या हल्ल्यानंतर भारताने देशातील सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक केली असून, पंजाब, हिमाचल प्रदेश व जम्मू-काश्मीरमधील सर्व विमानतळे प्रवासी विमानांसाठी बंद करण्यात आली होती.
या तिन्ही राज्यांबरोबरच राजस्थानातील जैसलमेर व गुजरातेतील कच्छ भागांतील सीमांपाशी बीएसएफ व लष्कराच्या तुकड्यांमध्ये वाढ केली आहे. मुंबईतील माझगाव डॉक, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, भाभा अणुशक्ती केंद्रासह अनेक भागांत हाय अलर्टच्या सूचना देण्यात आल्यात. मुंबई, दिल्ली, चेन्नई व कोलकाता या शहरांमध्ये हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेऊ न, या ठिकाणी दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. राजस्थानात सीमेलगत पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केल्याने भारतीय सैन्याच्या हालचालीही वाढल्या आहेत. पाकने सिंध भागातील हवाई तळावरून लढाऊ विमानांची उड्डाणे वाढविली आहेत.
पाकिस्तानने ताब्यात घेतलेले भारतीय हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान मूळचे चेन्नईचे असून, त्यांना पत्नी व दोन मुले आहेत. त्यांचे वडील भारतीय हवाई दलातून एअर मार्शल म्हणून निवृत्त झाले.
पाकचा व्हिडीओ
पाकिस्तानने एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यातील व्यक्तीचे नाव अभिनंदन आहे, असे सांगण्यात आले. चेहऱ्यावर काळा रुमाल बांधलेली व्यक्ती आपण भारतीय हवाई दलातील विंग कमांडर असून, माझा सर्व्हिस क्रमांक २७९८१ आहे, असे व्हिडीओमध्ये सांगताना दिसत होते. या व्हिडीओची सत्यता पडताळल्याशिवाय काही सांगणे अवघड आहे, असे वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.