पाक लष्कराकडूनच युवकांची दिशाभूल
By Admin | Published: December 29, 2014 04:20 AM2014-12-29T04:20:56+5:302014-12-29T04:20:56+5:30
तेहरिक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेने एक नवी चित्रफीत प्रसिद्ध केली असून, त्यात पाक लष्कर युवा मुजाहिदिनांची दिशाभूल
नवी दिल्ली : तेहरिक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेने एक नवी चित्रफीत प्रसिद्ध केली असून, त्यात पाक लष्कर युवा मुजाहिदिनांची दिशाभूल करीत असून, त्यांचा वापर जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार करण्यासाठी केला जात आहे. काश्मीरला स्वतंत्र करण्याच्या नावाखाली लष्कराचा हा खेळ चालला असल्याचा आरोप केला आहे.
ही चित्रफीत टीटीपीचा वरिष्ठ कमांडर अदनान रशीद याची आहे. अदनान रशीद पाक हवाई दलाचा माजी अधिकारी असून माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावरील हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या चित्रफितीत पाकिस्तानी सैनिकांना टीटीपीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाक लष्कराने आतापर्यंत केलेल्या अत्याचाराची यादी या चित्रफितीत देण्यात आली असून, त्यानुसार १९७१ च्या बांगलादेश युद्धात पाक लष्कराने लाखो लोकांच्या हत्या केल्या आहेत, आपल्याच बहिणींची अब्रू लुटली असा आरोप करण्यात आला आहे.
या चित्रफितीत अदनान रशीद याचे १५ मिनिटांचे भाषण असून, ती नाताळपूर्वी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पाकिस्तानचे लष्करी अधिकारी हे ब्राह्मण असून कनिष्ठ अधिकाऱ्यांना ते शूद्राप्रमाणे वागवत असल्याची टीकाही करण्यात आली आहे. रशीद याचे हे भाषण इंग्रजीत असून, त्याचे बोलणे ब्रिटिश धाटणीचे आहे. टीटीपीच्या प्रसिद्धी विभागाने म्हणजेच उमर मीडियाने ही चित्रफीत प्रसिद्ध केली आहे. १९४८ साली पाकमधील आदिवासी नागरिकांनी तुमच्यासाठी जम्मू-काश्मीरचे युद्ध लढले व काही भाग मुक्त केला.(लोकमत न्यूज नेटवर्क)