पाकच्या कुरापती कायम; दोन जवानांना वीरमरण
By admin | Published: July 13, 2017 05:57 AM2017-07-13T05:57:04+5:302017-07-13T05:57:04+5:30
हिजबुल मुजाहिद्दिनच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी दुपारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्यानंतर काश्मीरमधील सुरक्षा प्रचंड प्रमाणात वाढवल्यानंतर आणि हिजबुल मुजाहिद्दिनच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा केल्यानंतर पाकिस्तानने बुधवारी दुपारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने केलेल्या बेछूट गोळीबारात भारताच्या दोन जवानांना वीरमरण प्राप्त झाले.
कुपवाडा जिल्ह्याच्या केरन क्षेत्रात पाकिस्तानी लष्कराने जोरदार गोळीबार व तोफांचा मारा केला. यात भारताचे दोन जवान हुतात्मा झाले असल्याची माहिती लष्कराने दिली असली तरी त्या दोघांची नावे मात्र जाहीर करण्यास नकार दिला आहे. भारतीय जवानांचे गस्ती पथक व पाकिस्तानी लष्कर यांच्यात चकमक होऊ न, हे जवान शहीद झाल्याचे आधी सांगण्यात येत होते. केरन क्षेत्रातील फुरकिया गली भागात हा गोळीबार झाला. तो पाकिस्तानी लष्कराने केला की पाकच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (बॅट) केला, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र फुरकिया गली भागातून पाकिस्तानी दहशतवादी नेहमी घुसण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्या वेळी बॅटतर्फे गोळीबार केला जातो. आजही तसे घडले का, हे सांगण्यात आलेले नाही. (वृत्तसंस्था)
>आझादीच्या घोषणा
हा प्रकार घडण्याच्या काही तास आधीच भारतीय सुरक्षा दलांनी बडगाम जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांचा खातमा केला होता. त्यातील एका दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेच्या वेळी जमलेल्या हजारो लोकांनी काश्मीरच्या आझादीच्या घोषणा दिल्या आणि सुरक्षा दलाच्या जवानांवर दगडफेकही केली.
>राहुल यांचे टीकास्त्र :
नवी दिल्ली : देशाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आलेली असताना भाजपा एका व्यक्तीच्या प्रतिमा संवर्धनात मग्न आहे. अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला दहशतवादी हल्ला आत्ममग्नतेचे ढळढळीत उदाहरण आहे, असा हल्ला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. सुरक्षेतील चूक मान्य होणारी नाही. मोदी यांना ही जबाबदारी घ्यावी लागेल व पुन्हा असे घडणार नाही याची व्यवस्था करावी लागेल, असे गांधी म्हणाले.ते म्हणाले की, गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला ईदनंतर मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरू आहे व अमरनाथ यात्रा हे त्यांचे लक्ष्य आहे, असे आधीच सांगितले होते. असे असतानाही सरकारने सुरक्षेची पूर्ण उपाययोजना का केली नाही?मोदी यांच्या वैयक्तिक लाभापायी निष्पाप भारतीयांचे बलिदान सुरू आहे. भाजपाने क्षणिक राजकीय लाभासाठी पीडीपीशी जी युती केली, त्याची मोठीच किंमत देश मोजत आहे.
>भाजपाचा प्रतिहल्ला
काश्मीरमधील दहशतवादाची समस्या ही नेहरू-गांधी परिवाराने निर्माण केली आहे, असा प्रतिहल्ला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर चढवला. परदेशातून आल्यानंतर राहुल यांनी दहशतवाद्यांचा नव्हे, तर नरेंद्र मोदी यांचा निषेध केला, यातूनच सारेकाही स्पष्ट झाले आहे, असेही त्यांनी बोलून दाखवले.
>काश्मीरमधील अतिरेक्यांना आम्ही संपवत आणले असून, येथील दहशतवाद लवकरच पूर्णपणे संपेल, असा दावा पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जीतेंद्र सिंग यांनी येथे केला.