भारताच्या हवाई तळावर पाक अतिरेक्यांचा हल्ला

By admin | Published: January 3, 2016 05:09 AM2016-01-03T05:09:10+5:302016-01-03T05:09:10+5:30

मैत्रीचा हात पुढे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आकस्मिक लाहोर भेटीला आठवडा उलटण्याच्या आत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या एका सशस्त्र गटाने शनिवारी पहाटे पठाणकोटमधील

Pak militants attack Indian airspace | भारताच्या हवाई तळावर पाक अतिरेक्यांचा हल्ला

भारताच्या हवाई तळावर पाक अतिरेक्यांचा हल्ला

Next

पठाणकोट : मैत्रीचा हात पुढे करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आकस्मिक लाहोर भेटीला आठवडा उलटण्याच्या आत पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या एका सशस्त्र गटाने शनिवारी पहाटे पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर हल्ला चढविला. भारत-पाकिस्तान सरहद्दीपासून सर्वांत जवळ असलेल्या या हवाई तळावर हल्लेखोरांना रोखण्यास झालेल्या तब्बल १५ तासांच्या चकमकीत भारतीय जवानांनी प्राणांची बाजी लावली. या भीषण चकमकीत पाचही हल्लेखोरांना कंठस्नान घालताना तीन जवान शहीद झाले.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्या थेट देखरेखीखाली दहशतवाद्यांविरुद्ध ही मोहीम राबविण्यात आली. या हल्ल्यामुळे एकाचवेळी पंजाब पोलिसांची ढिलाई व डोवल यांच्या देखरेखीतील गुप्तचरांची तत्परता अधोरेखित झाली. गुरुवारी रात्री पंजाब पोलिसांच्या एका एसपीचे काही सशस्त्र दहशतवाद्यांनी अपहरण केल्यानंतर हल्ल्याच्या संशयाने डोवल यांनी एनएसजी कमांडोंचे एक पथक शुक्रवारी रात्रीच येथे पाठविले होते. याशिवाय लष्कराची एक तुकडीही तळावर तैनात करण्यात आली होती. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यातील शांतता व चर्चेच्या प्रक्रियेत खोडा घालण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचण्यात आला होता, अशी आपली विश्वसनीय माहिती असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले, तर आम्हाला शांतता हवी असली तरी जसास तसे प्रत्युत्तर मिळेल असा इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला. विशेष म्हणजे पाकिस्तानी परराष्ट्र खात्याने या हल्ल्याचा निषेध केला आहे.
या हल्ल्यानंतर पंजाब, दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडसह देशभरात सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंजाबमध्ये गेल्या सहा महिन्यात झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. गेल्या वर्षी २७ जुलैला गुरुदासपूरमधील एका पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
आरडीएक्ससह घुसले दहशतवादी
मोठ्या प्रमाणात आरडीएक्ससह या दहशतवाद्यांनी जंगलात असलेल्या हवाईदल तळाच्या मागच्या बाजूने प्रवेश केला. परंतु ते तळाच्या बाह्य भागात असलेल्या ‘लंगर’मधून पुढे सरकू शकले नाहीत. कारण सुरक्षा दलाचे जवान त्यांचा मुकाबला करण्यास सज्ज होते.
हल्ल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल नॅशनल सिक्युरिटी कंट्रोल रूममध्ये बसूनया संपूर्ण घडामोडींवर नजर ठेवून होते.

दहशतवाद्यांना शोधण्यासाठी ड्रोनचा वापर
हवाईदल तळावर पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला. परंतु तळाचे सुरक्षा कवच भेदून दहशतवादी आत प्रवेश करूशकले नाहीत. त्यांना सुरक्षा दलाने बाहेरच रोखून धरले. सुरुवातीस जवळपास पाच तास चाललेल्या या भीषण चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यानंतर आणखी काही दहशतवादी दडले आहेत का, हे पाहण्यासाठी लागलीच शोधमोहीम राबविण्यात आली. त्यादरम्यान झालेल्या गोळीबार आणि स्फोटांनंतर लष्कराने आॅपरेशन जारी ठेवले. अखेर दडून बसलेल्या पाचव्या दहशतवाद्यालाही सायंकाळी उशिरा कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले. हा दहशतवादी झुडपी भागात दडून ग्रेनेड््सचा हल्ला करीत होता. हा संशयित दहशतवादी ज्या भागात दडून बसला होता त्या संपूर्ण परिसराला वेढा घातल्यावर त्याला शोधण्याकरिता ड्रोनचाही वापर केला गेला.

दहशतवाद्यांचा खात्मा करण्याकरिता हवाईदलाने संयुक्त दलाच्या मदतीसाठी एमआय-२५ बनावटीची दोन लढाऊ हेलिकॉप्टर तैनात केली होती.
या हल्ल्याने तळाच्या गाभ्याला कुठलाही धक्का बसला नसून येथील हेलिकॉप्टर आणि इतर सामग्री सुरक्षित आहे.
हवाईदलाच्या या तळावर मिग-२१ लढाऊ विमाने व एमआय-२५ लढाऊ हेलिकॉप्टरचा ताफा आहे.

हा हल्ला भारताची प्रगती न पाहवणाऱ्या ‘मानवतेच्या शत्रूंनी’ रचलेले कारस्थान आहे. देशाच्या शत्रूचे असे कुटिल डाव हाणून पाडण्यास आपली सशस्त्र सेनादले पूर्णपणे समर्थ आहेत.
- नरेंद्र मोदी

Web Title: Pak militants attack Indian airspace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.