पाक हा दहशतवादी देश : राजनाथ सिंह

By admin | Published: September 19, 2016 06:13 AM2016-09-19T06:13:56+5:302016-09-19T06:13:56+5:30

पाकिस्तान हा दहशतवादी देश असून, त्याला वेगळे पाडले पाहिजे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी म्हटले.

Pak terrorists country: Rajnath Singh | पाक हा दहशतवादी देश : राजनाथ सिंह

पाक हा दहशतवादी देश : राजनाथ सिंह

Next


नवी दिल्ली : पाकिस्तान हा दहशतवादी देश असून, त्याला वेगळे पाडले पाहिजे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी म्हटले. अतिशय कठोर शब्दांतील निवेदनाद्वारे सिंह यांनी पाकिस्तानवर हल्ला केला.
ते म्हणाले, ‘‘उरी येथील हल्लेखोरांना अतिशय पद्धतशीरपणे प्रशिक्षण दिले गेले होते. या हल्ल्यांच्या मागे हात असलेल्यांना शिक्षा केली जाईल.’’ पाकिस्तान सातत्याने दहशतवादाला व दहशतवादी गटांना थेट पाठिंबा देत असल्याबद्दल सिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाकिस्तान हा दहशतवादी देश असून, त्याला वेगळे पाडले पाहिजे, असे ते म्हणाले. सुमारे तासभर चाललेल्या या आढावा बैठकीनंतर राजनाथ सिंह म्हणाले की, बैठकीत जी चर्चा झाली तिची माहिती मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. बैठकील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल, गृह आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, लष्कर आणि निमलष्करी दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.भाजपाध्यक्ष अमित शाह म्हणाले की, अतिरेकी संघटनांना मदत करून पाकिस्तान भारतात अस्थिरता आणण्याचा प्रयत्न करीत आहे. भारत दीर्घकाळापासून पाकिस्तान समर्थित दहशतवादाचा मुकाबला करीत आहे आणि हे युद्ध आता निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सैन्याचा पोषाख
काश्मिरातील उरी येथे लष्करी तळावर हल्ला करणारे अतिरेकी हे सैन्याच्या पोषाखात आले होते. अतिरेक्यांनी यापूर्वी केलेल्या अनेक हल्ल्यांतही सैन्याचा पोषाख परिधान केला होता. संसद हल्ला, पठाणकोट हल्लाही याच प्रकारे करण्यात आला होता.
>युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न
श्रीनगर : उरी येथील हल्ला हा राज्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे, मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले. त्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत धिक्कार केला. हल्ल्याचा हेतू हा जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा हिंसाचार सुरू करून युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचा आहे, असे त्यांनी येथे निवेदनात म्हटले.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या संबंधांमुळे उरी हल्ल्यातून राज्यात विषारी वातावरण निर्माण होईल, असे त्या म्हणाल्या. उभय देशांतील शत्रुत्वाच्या संबंधाचा जम्मू आणि काश्मीर फार मोठा बळी ठरला असून, गेल्या सहा दशकांपासून राज्यातील जनता त्याची फार मोठी किंमत मोजत असल्याचे मुफ्ती म्हणाल्या. माजी मुख्ममंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही उरी हल्ल्याचा निषेध केला.
>जम्मू-काश्मीरमध्ये १९९९पासून झालेले दहशतवादी हल्ले
३ नोव्हेंबर १९९९ : श्रीनगरच्या बदामी बागेतील १५ कोअरच्या मुख्यालयावर झालेल्या फिदायीन हल्ल्यात लष्कराचे १० जण ठार.
१४ मे, २००२ : जम्मूतील कालुचाक येथील लष्करी छावणीवर झालेल्या हल्ल्यात ३६ जण ठार तर ४८ जण जखमी. ठार झालेले बहुतेक जण हे एकाच कुटुंबातील होते.
२२ जुलै, २००३ : अखनूर येथे लष्कराच्या छावणीवर तीन दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ब्रिगेडियरसह आठ सुरक्षा कर्मचारी ठार तर १२ जण जखमी.
६ एप्रिल, २००५ : श्रीनगरहून पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबाद अशी बस सेवा सुरू व्हायच्या आदल्या दिवशी पर्यटकांच्या स्वागत केंद्रावर दोन आत्मघाती हल्लेखोरांचा हल्ला.
५ आॅक्टोबर, २००६ : श्रीनगर शहरातील वर्दळीच्या बुदशाह चौकात दहशतवादी हल्ल्यात जम्मू आणि काश्मीर पोलीस दलातील पाच जण, केंद्रीय राखीव पोलीस दलातील दोघे आणि एक नागरिक ठार.
३१ मार्च, २०१३ : श्रीनगरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवर हल्ल्यात पाच जण ठार.
२४ जून २०१३ : श्रीनगरमधील हैदरपुरा येथे लष्कराच्या ताफ्यावरील हल्ल्यात आठ जवान ठार.
२६, सप्टेंबर, २०१३ : जम्मू आणि काश्मीरमध्ये कठुआ जिल्ह्यात दोन आत्मघाती हल्ल्यांत १३ ठार. मृतांत तीन दहशतवादी, चार पोलीस कर्मचारी, दोन नागरिक व लष्कराचे चार जवान होते.
२४ नोव्हेंबर, २०१४ : जम्मू जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील अर्निया भागातील कतहार खेड्यात दिवसभर चाललेल्या चकमकीत
१० जण ठार. त्यात लष्कराचे तीन जवान, चार नागरिक आणि तीन अतिरेकी होते.
५ डिसेंबर, २०१४ : नियंत्रण रेषेवरील बारामुल्ला जिल्ह्यानजीकच्या उरी भागातील मोहरा येथे सशस्त्र दहशतवाद्यांच्या गटाचा लष्कराच्या ३१ फिल्ड रेजिमेंट आॅर्डनन्स छावणीवर हल्ला. त्यात लेफ्टनंट कर्नल व लष्कराचे सात जवान, सहायक पोलीस निरीक्षक व जम्मू आणि काश्मीरचे दोन पोलीस ठार.
२० मार्च, २०१५ : कथुआ जिल्ह्यातील पोलीस ठाण्यावर फिदायीन अतिरेक्यांचा हल्ला. त्यात सुरक्षा दलाचे तीन जण, दोन नागरिक व दोन अतिरेकी ठार. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे आठ, तीन पोलीस व एक नागरिक जखमी.
२१ मार्च, २०१५ : दोन अतिरेक्यांनी जम्मू-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावरील लष्कराच्या छावणीवर केलेल्या हल्ल्यात तेच ठार. या हल्ल्यात एका नागरिकासह मेजर व लष्कराचा जवान जखमी.
३१ मे, २०१५ : कुपवाडा जिल्ह्यातील तंगहार जिल्ह्यात लष्कराने आपल्या ब्रिगेड मुख्यालयावरील हल्ला उधळून लावला. त्यात सहा सशस्त्र अतिरेक्यांपैकी चार ठार.
१८ नोव्हेंबर, २०१५ : कुपवाडातील जंगलात अतिरेक्यांसोबत झालेल्या चकमकीत कर्नल ठार.
२५ नोव्हेंबर, २०१५ : उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळील तंगहार येथे लष्कराच्या छावणीवर जैश ए मोहमंदच्या अतिरेक्यांचा हल्ला. तीन हल्लेखोर ठार.
७ डिसेंबर, २०१५ : दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात बिजबेहाडात समथान येथे ग्रीन टनेलनजीक लष्कराच्या ताफ्यावर अतिरेक्यांचा हल्ला. त्यात सीमा सुरक्षा दलाचे सहा जण जखमी.
२१ फेब्रुवारी, २०१६ : श्रीनगरच्या जवळ सरकारी इमारतीत दहशतवाद्यांशी झालेल्या भीषण चकमकीत लष्कराच्या दोन कॅप्टन्ससह तीन जण ठार.
२५ जून, २०१६ : श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील श्रीनगर येथील पाम्पोरनजीक लष्कराच्या ताफ्यावर अतिरेक्यांचा हल्ला. त्यात सीमा सुरक्षा दलाचे आठ जण ठार तर २० जखमी.
>अमेरिकेकडून निषेध
उरी येथील हल्ल्याचा अमेरिकेने कठोर शब्दांत निषेध केला आहे. आमच्या संवेदना मृत जवानांच्या कुटुंबीयांबरोबर आहेत, असे अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी टिष्ट्वटरद्वारे म्हटले.
>दहशतवादी शक्तींना खतपाणी घालणे बंद करा
माकपच्या मध्यवर्ती समितीची बैठक येथे सुरू असून, पाकिस्तानने दहशतवादी शक्तींना खतपाणी घालणे बंद करावे, असे आवाहन तीत करण्यात आले. पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी वार्ताहरांशी येथे बोलताना पाकिस्तानने सीमेपलीकडून अतिरेकी कारवाया करण्याचे बंद करावे, असे सांगून हा विषय तातडीने विचारात घेण्याचा असल्याचे म्हटले.
जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या संख्येने सुरक्षा दले तैनात करण्यात आल्यानंतरही सरकार घुसखोरी थांबवू शकले नसल्याबद्दल सरकारवर त्यांनी टीकाही केली. काश्मीर प्रश्नावर दहशतवाद हा काही उपाय नसल्याचे आम्ही फार पूर्वीच म्हटले असून, राजकीय संवाद व चर्चा याद्वारेच तो निघेल, असे येचुरी म्हणाले. वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी उरीतील हल्ल्याबद्दल तीव्र वेदना होत असल्याचे टिष्ट्वट केले. झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
>शिक्षा करू : रिजिजू
केंद्रीय गृह राज्य मंत्री किरेन रिजिजू यांनी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. हल्ल्याचे दुष्कृत्य केलेल्यांना शिक्षा होईल, असे ते म्हणाले.
>गुडघे टेकणार नाही
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारत अशा हल्ल्यांनी गुडघे टेकणार नाही, असे म्हटले.
>लढाई निर्णायक टप्प्यात : शाह
उरीतील अतिरेकी हल्ल्याप्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पाकिस्तानला लक्ष्य करतानाच दहशतवादाविरुद्धची लढाई आता निर्णायक टप्प्यात आली असल्याचे म्हटले आहे. दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारच्या धोरणांचे समर्थन करून ते म्हणाले की, सरकार योग्य दिशेने मार्गक्रमण करीत आहे. हा अतिरेक्यांचा भ्याड हल्ला असल्याचे सांगत त्यांनी १७ बहादूर जवानांच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले.
>घुसखोरी रोखा : चिदंबरम
माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम म्हणाले की, सीमेपलीकडून काश्मीरमध्ये होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सरकारने सुरक्षा दलांना सक्रिय केले पाहिजे. ताज्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सीमाभाग असे हल्ले रोखण्यासाठी अधिक मजबूत केला पाहिजे, असे चिदंबरम निवेदनात म्हणाले. या हल्ल्याने मला तीव्र धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले.
>संयमाचे दिवस संपले
भाजपाचे ज्येष्ठ नेते राम माधव यांनी व्यूहरचनात्मक संयमाचे दिवस आता संपले असून, ‘एका दातासाठी संपूर्ण जबडा’ असे धोरण राबविले पाहिजे, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. पंतप्रधानांनी या हल्ल्यामागे जे आहेत त्यांना शिक्षा दिली जाईल, असे म्हटले असून, याच मार्गाने पुढे वाटचाल झाली पाहिजे, असे ते म्हणाले.
>धोरण बदला : तिवारी
काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी पाकिस्तानला वेगळे पाडण्याच्या धोरणाचा भारत सरकारने फेरविचार केला पाहिजे, असे म्हटले. उरी येथे जे घडले ते निंदनीयच आहे; परंतु भारत सरकारने कोणकोणते पर्याय वापरता येतील याचाही विचार केला पाहिजे, असे म्हटले.
>धोरणाचा फेरविचार व्हावा : जितेंद्र सिंह
उरीसारखे हल्ले भविष्यात होऊ नयेत यासाठी धोरणाचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे, असे पंतप्रधान कार्यालयातील मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले. देश पुन्हा पुन्हा आमच्या अमूल्य जवानांच्या प्राणांचे मोल किती दिवस देत राहणार आहे, असे सिंह म्हणाले.
>नितीश कुमारांकडून निषेध
पाटणा : उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तीव्र निषेध केला. या हल्ल्यात ज्या जवानांना वीरमरण आले त्यांची आठवण देशाला नेहमी येईल, असे त्यांनी निवेदनात म्हटले.
>फिदायीन हल्ल्यांचे भारतासमोर आव्हान
जालंधर : फिदायीन हल्ले हे आता मुख्य आव्हान बनले असून, त्यांना तोंड कसे द्यायचे याचे धोरण सुरक्षा दले तयार करतील, असे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी येथे म्हटले. अशा स्वरूपाचे हल्ले हे आमच्या सुरक्षेलाच आव्हान बनले आहे. पठाणकोट आणि उरी येथील हल्ले हे पुन्हा फिदायीन हल्ले सुरू झाल्याचे संकेत आहेत.
हे मोठे आव्हान असून, आमची सुरक्षा दले त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी तयार असतील, असे जेटली यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले. जेटली म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांत ‘दगडफेक करणारे आंदोलन’ अशा स्वरूपाच्या कारवायांचा जास्त आधार घेतला जात आहे व त्यांना सीमेपलीकडून चिथावणी आहे.’’ केंद्रात कोणते सरकार आहे याच्याशी या दहशतवादी हल्ल्यांचा काहीही संबंध नाही, असे त्यांनी एका उत्तरात सांगितले.
>‘नाम’ने ठोस कृती करावी : अन्सारी
पोरलामार (व्हेनेझुएला) : दहशतवादाच्या संकटाला तोंड देण्यासाठी अलिप्त राष्ट्र चळवळीतील (नाम) १२० देशांनी परिणामकारक ठरेल असे सहकार्य करून विशिष्ट यंत्रणा उभारून ‘ठोस कृती’ करावी, अशी स्पष्ट मागणी भारताने रविवारी येथे केली. १७व्या नाम शिखर परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केले. ते खुल्या अधिवेशनात बोलताना म्हणाले, ‘‘आज मानवी हक्कांचे सर्वांत जास्त उल्लंघन होते ते दहशतवादामुळे आणि दहशतवादाचा वापर देशाचे धोरण म्हणून होणे हे नि:संदिग्धपणे निषेधार्थ आहे.’’
>सडेतोड उत्तर देऊ
काश्मीरमधील उरी येथे रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हमीद अन्सारी यांनी तीव्र शब्दांत निषेध करून हे कृत्य सीमेपलीकडून आमच्या भागात एका देशाकडून होणाऱ्या दहशतवादाचा परिणाम आहे, असे येथे म्हटले. या अशा हल्ल्यांना आम्ही सडेतोड उत्तर देऊ, असेही ते म्हणाले.
>असा झाला उरी हल्ला
४ वाजता : अतिरेकी उरी येथील लष्करी तळावर घुसले.
४.०३ : एका अतिरेक्याने आत्मघातकी हल्ला केला, त्यामुळे तंबूला आग लागली.
४.०४ : शिबिरातील सैनिक सज्ज झाले.
७.०० : पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याला दुजोरा दिला.
७.५० : सहा जवान जखमी झाल्याचे वृत्त.
८.०० : सैन्याचे विशेष कमांडो हेलिकॉप्टरने घटनास्थळी.
८.१० : गृहमंत्री राजनाथ सिंंह यांनी रशिया, अमेरिका दौरा केला रद्द.
८.२५ : सैन्याचे दोन जवान शहीद.
८.५० : गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आपत्कालीन बैठक बोलाविली.
९.०० : जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी राजनाथ सिंह यांना उरीतील परिस्थितीची दिली माहिती.
९.५७ : राजनाथ सिंह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलाविली.
१०.१० : चार अतिरेकी मारले गेल्याची सैन्याच्या प्रवक्त्यांची माहिती.
१०.१५ : घटनास्थळी सैन्याच्या जवानांकडून तपास अभियान सुरू.
१०.५९ : सैन्य प्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग काश्मिरात दाखल.
११.०० : सैन्याच्या प्रवक्त्यांकडून १७ जवान शहीद झाल्याची माहिती.
११.०१ : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर श्रीनगरमध्ये दाखल.
१२.०४ : गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली माहिती.
१२.१० : मनोहर पर्रीकर आणि सैन्य प्रमुख दलबीर सिंह सुहाग उरीकडे दाखल.
१२.४९ : चारही अतिरेक्यांचे मृतदेह घेतले ताब्यात.
१२.५२ : राजनाथ सिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
>कारस्थान्यांना उघडे पाडू : प्रणव मुखर्जी
नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रविवारी उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून दहशतवादी आणि त्यांना पाठिंबा असलेल्यांच्या कारस्थानांना आम्ही उघडे पाडू, असे म्हटले. अशा हल्ल्यांमुळे भारत शरण येणार नाही. दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांचे कटकारस्थान आम्ही उघडे पाडू, असे मुखर्जी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता म्हटले. ठार झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांबद्दल त्यांनी सहानुभूती व्यक्त करून जखमी जवान लवकरच बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली.
>सोनिया, राहुलकडून निषेध
प्रमुख राजकीय पक्षांनी उरी येथील दहशतवादी हल्ल्यांचा तीव्र धिक्कार केला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हल्ल्यामागील शक्तींशी कठोरपणे व्यवहार केला जाईल, असे म्हटले. हल्ल्यात ठार झालेल्या जवानांबद्दल गांधी यांनी निवेदनाद्वारे तीव्र दु:ख व्यक्त केले. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हुतात्मा झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Web Title: Pak terrorists country: Rajnath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.