पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच
By admin | Published: October 25, 2015 11:12 PM2015-10-25T23:12:55+5:302015-10-25T23:12:55+5:30
जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील १४ सीमा चौक्या आणि सीमेवरील गावांवर अंदाधुंद गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करून पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
जम्मू : जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील १४ सीमा चौक्या आणि सीमेवरील गावांवर अंदाधुंद गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करून पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले आहेत.
पाकिस्तानी रेंजर्सनी शनिवारी रात्री ९.०५ च्या सुमारास सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या एकूण १४ चौक्यांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनी गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंकडील हा गोळीबार रविवारी पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू होता. पाकी रेंजर्सनी ८२ आणि ८५ एमएमच्या उखळी तोफांमधून तोफगोळे डागले. यावेळी सीमेवरील गावांवरही गोळीबार करण्यात आला. ज्यात दोन नागरिक जखमी झाले, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली. शनिवारीही पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार केला होता.
पूंछ जिल्ह्याच्या लोर देवता भागात लष्करी जवानांनी प्रत्येकी दहा आणि सहा किलो वजनाची दोन स्फोटके हस्तगत केली.