आनंदी देशांच्या यादीत भारताला पछाडत पाक आणि चीन पुढे
By admin | Published: March 21, 2017 03:56 PM2017-03-21T15:56:32+5:302017-03-21T16:02:49+5:30
चीन, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांच्या तुलनेत भारत कमी आनंदी देश असल्याचं समोर आलं
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - जगभरात कमी आनंदी राहणा-या देशांमध्ये भारतसुद्धा एक आहे. चीन, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांच्या तुलनेत भारत कमी आनंदी देश असल्याचं समोर आलं आहे. 2017च्या वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्टनुसार, 155 देशांच्या यादीत भारताला 122वं स्थान मिळालं आहे.
रिपोर्टनुसार दहशतवाद्यांचं नंदनवन असलेला पाकिस्तान आणि नेपाळसारखा गरीब देश आनंदाच्या बाबतीत भारताच्या पुढे आहेत. या यादीत पाकिस्तान 80व्या, भूतान 97व्या, नेपाळ 99व्या, बांगलादेश 110व्या आणि श्रीलंका 120व्या स्थानी आहे. मात्र डेन्मॉर्कनं पहिल्या पाचात स्थान मिळवलं आहे.
गेल्या वर्षी या यादीत भारताला 118व्या स्थानी दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे भारताच्या क्रमांकात यंदा चार अंकांनी वाढ झाली आहे. आनंदाच्या बाबतीत भारत सार्क देशांमधील अधिकतर देशांच्या मागे आहे. मात्र यात मालदीवचा समावेश करण्यात आला नाही. यादीत अफगाणिस्तानला 141व्या स्थानावर जागा देण्यात आली आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय आनंदी दिवसाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात हा रिपोर्ट प्रसिद्धीस देण्यात आला आहे. त्यामुळे भारत कमी आनंदी देश असल्याचं समोर आलं आहे. 2017च्या वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्टनुसार, अमेरिकेला पहिल्या पाच देशांमध्येही जागा बनवता आली नाही. अमेरिकेला या यादीत 14वे स्थान देण्यात आले आहे. यादीत नार्वेशिवाय डेन्मॉर्क, आइसलँड, स्वित्झर्लंड आणि फिनलँड या देशांनी पहिल्या पाचात स्थान मिळवलं आहे. जगभरातल्या देशांतील लोकांच्या आनंदाची माहिती घेण्यासाठी फक्त पैसा आधार घेण्यात आला नाही. तर त्यासाठी लोकांचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, उदारता, सामाजिक स्तर आणि भ्रष्टाचाराचं मूल्यमापन करून ही 2017ची वर्ल्ड हॅपिनेस यादी बनवण्यात आली आहे.