पाकिस्तानशी लष्कर तर चीनसोबत भिडणार व्यापारी !
By admin | Published: October 4, 2016 10:16 PM2016-10-04T22:16:33+5:302016-10-04T22:22:05+5:30
ब्रम्हपुत्रा नदीचं पाणी अडवून आणि जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यामध्ये आडकाठी घालून चीनने पाकिस्तानची पाठराखण करणे सुरूच ठेवले
Next
ऑनलाइन लोकमत
रेवाडी, दि. 4 - ब्रम्हपुत्रा नदीचं पाणी अडवून आणि जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यामध्ये आडकाठी घालून चीनने पाकिस्तानची पाठराखण करणे सुरूच ठेवले आहे. मात्र, आता चीनला धडा शिकवण्यासाठी भारतातील व्यापारी सज्ज झाले आहेत.
हरियाणातील रेवाडी जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटनांनी यापुढे चीनचे कोणतेही सामान, वस्तू जिल्ह्यात विकणार नाही असा ठराव संमत केला आहे. आता केवळ सोशल मिडीयावरच चीनचा विरोध करणार नाही तर त्यांच्या सामानावर बहिष्कार टाकून चीनची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा आमचा प्रयत्न असेल असं व्यापारी म्हणाले. 'अमर उजाला'च्या वृत्तानुसार हरियाणामध्ये सोमवारी चीनच्या वस्तूंची या व्यापा-यांनी होळी केली.
चीन पाकिस्तानला मदत करत आहे, त्यामुळे चीनच्या सामानावर बहिष्कार टाकणं गरजेचं आहे असं इथल्या व्यापा-यांनी म्हटलं आहे. या एकाच जिल्ह्याच्या बहिष्कारामुळे चीनचे जवळपास 450 कोटींचे नुकसान होणार आहे. चीनच्या वस्तू विकल्याने फायदा जास्त होत असला तरी देशहितासाठी हा निर्णय घेतला असल्याचे व्यापारी म्हणाले. दिवाळीमध्ये विकल्या जाणा-या सामानांमध्ये 50 टक्के सामान हे चीनचे असते, फटाकेदेखील चीनी असतात. मात्र, आता रेवाडीच्या व्यापा-यांनी घेतलेल्या निर्णयाचा चीनला फटका बसणार आहे.
चीनच्या सामानांवर बहिष्कार टाकूनच हे व्यापारी थांबले नाहीत, चीन विरोधात सोशल मिडीयावरदेखील त्यांनी मोहिम उघडली आहे. स्वदेशी सामान खरेदी करण्याचा पंतप्रधान मोदींचा भावूक मेसेज, चायनीज सामान न घेण्याची शपथ आदी मेसेज फेसबुक व्हॉट्स अॅपवर व्हायरल होत आहेत.
पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था ढासळवण्यासाठी देशवासियांना चीननिर्मित वस्तू खरेदी करू नये असे आवाहन इथल्या व्यापा-यांनी केलं आहे.