पाकिस्तानचा यू-टर्न; फक्त एक वैमानिक ताब्यात असल्याचा नवा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 09:38 PM2019-02-27T21:38:01+5:302019-02-27T21:38:51+5:30
दुपारी दोन वैमानिक ताब्यात असल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता
नवी दिल्ली: जुने फोटो दाखवून खोटी माहिती देणाऱ्या पाकिस्तानचा आणखी एक खोटारडेपणा समोर आला आहे. आज सकाळी भारतीय हवाई दलानं कारवाई केल्यानंतर दोन भारतीय वैमानिक ताब्यात असल्याचा दावा पाकिस्ताननं केला होता. मात्र संध्याकाळी पाकिस्ताननं आपल्या ताब्यात फक्त एकच वैमानिक असल्याचं म्हटलं. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली. एका वैमानिकाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला पाकिस्तान भारतीय वैमानिक समजत होता. मात्र तो पाकिस्तानी हवाई दलाचा वैमानिक निघाला, अशी माहिती समोर आली.
'पाकिस्तानच्या ताब्यात केवळ एकच वैमानिक आहे. लष्करी कायद्यानुसारच विंग कमांडर अभिनंदन यांना वर्तणूक दिली जात आहे,' असं ट्विट गफूर यांनी केलं. यासोबत त्यांनी एक फोटोदेखील शेअर केला. यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना समन्स बजावलं. भारतीय वैमानिकाला कोणताही त्रास होता कामा नये, अशी समज त्यांना देण्यात आली. अभिनंदन यांची सुखरुप सुटका करा, असंदेखील त्यांना सांगण्यात आलं. यावेळी भारताकडून पाकिस्तानच्या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
पाकिस्तानची कृती अतिशय दुर्दैवी असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना सुनावलं. 'भारतानं दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन केलं. मात्र पाकिस्ताननं भारताविरोधात कारवाई करताना आक्रमक पवित्रा घेतला,' अशा शब्दांमध्ये भारताकडून पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांची कानउघाडणी करण्यात आली. जखमी जवानाला पाकिस्ताननं दिलेली वर्तणूक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार नियमांचं आणि जेनेव्हा कायद्याचं उल्लंघन करणारी असल्याचं म्हणत भारतानं जोरदार आक्षेप नोंदवला.