पाकिस्तानच्या कुरापती सुरूच ! पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 12:27 PM2017-09-27T12:27:04+5:302017-09-27T12:53:42+5:30
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. बुधवारी सकाळीदेखील पाकिस्तानकडून भीमबेर गली आणि पूंछ सेक्टरमध्ये शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आले आहे.
श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. बुधवारी सकाळीदेखील पाकिस्तानकडून भीमबेर गली आणि पूंछ सेक्टरमध्ये शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्ताननं सीमारेषेवर भारतीय लष्कराच्या चौक्या आणि निवासी परिसरांना टार्गेट करत गोळीबार केला आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय लष्करानंही सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
#FLASH J&K: Pakistan Army violated ceasefire from 0815 hours in Poonch and Bhimber Gali sectors along LoC. Indian Army retaliating. pic.twitter.com/XyfrVtht3x
— ANI (@ANI) September 27, 2017
भारतीय जवानांनी पाकच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा हल्ल्याचा उधळला कट
दरम्यान, केरान सेक्टरमधील भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्याचा पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमचा प्रयत्न मंगळवारी ( 26 सप्टेंबर ) भारतीय जवानांनी उधळून लावला. पाकिस्तानच्या बॅट फोर्सचे सात ते आठ सशस्त्र सैनिक भारतीय लष्कराच्या चौकीजवळ आले होते. त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानी सैन्याकडून कव्हर फायर देण्यात येत होती. भारतीय चौक्यांवर गोळीबार आणि मोर्टारचा मारा करण्यात येत होता. भारतीय चौकी उद्ध्वस्त करण्याच्या हेतून बॅट फोर्सचे सैनिक आले होते. पण सतर्क असलेल्या भारतीय जवानांनी त्यांचा कट उधळून लावला. यावेळी झालेल्या चकमकीत भारताच्या बाजूनं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न पाडला हाणून
तर दुसरीकडे मंगळवारी सकाळी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टर परिसरातही नियंत्रण रेषेवरजवळ दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट भारतीय लष्करानं उधळून लावला. दहशतवाद्यांचा घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडत एका दहशतावाद्याला यमसदनी धाडण्यातही जवानांना यश आले. लष्कराच्या एका अधिका-यानं दिलेल्या माहितीनुसार, उरी सेक्टरच्या झोरावर क्षेत्रात दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला व एका दहशतवाद्याचा खात्मा केला. दरम्यान, चकमक घडलेल्या स्थळावरुन एक हत्यारदेखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती या अधिका-यानं दिली आहे.
लष्कराने केला खतरनाक दहशतवाद्याचा खात्मा
तर दुसरीकडे, जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी ( 27 सप्टेंबर ) भारतीय लष्कराने एका खतरनाक दहशतवाद्याचा खात्मा केला. लष्कर-ए-इस्लामचा प्रमुख अब्दुल कय्युम नजरला सुरक्षा रक्षकांनी कंठस्नान घातले. उरी सेक्टरमध्ये सुरक्षा जवानांबरोबर झालेल्या चकमकीत तो मारला गेला. सुरक्षा पथकांना मिळालेलं हे मोठं यश आहे. 50 पेक्षा जास्त हत्या प्रकरणात त्याचा सहभाग होता. गेल्या 17 वर्षांपासून अब्दुल नजर काश्मीर खो-यात सक्रीय होता.
उरीमधल्या लाचीपोरामधून घुसखोरीचा प्रयत्न करत असताना सुरक्षा पथकांनी त्याला कंठस्नान घातले. आज सकाळी नियंत्रण रेषेजवळ लाचीपोरा येथे सुरक्षा पथकांनी घुसखोरीचा कट उधळून लावला. त्यावेळी झालेल्या चकमकीत तो मारला गेला अशी माहिती बारामुल्लाचे एसएसपी इम्तियाज हुसैन यांनी दिली. काश्मीरमधील टॉपच्या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यामुळे त्याच्याकडे लष्कर-ए-इस्लाम पुर्नजिवित करण्याची जबाबदारी दिली होती.
हिजबुल मुजाहिद्दीनमधून फुटून बाहेर पडलेल्या लष्कर-ए-इस्लामचे तो नेतृत्व करत होता. 43 वर्षीय अब्दुल नजर सोपोरचा राहणार होता. तो पाकिस्तानातही जाऊन आला होता. गावच्या सरपंचासह अनेक हत्या प्रकरणात त्याचा सहभाग होता. वयाच्या 16 व्या वर्षापासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होता. काश्मीरमधल्या अनेक मोबाईल टॉवरवरील हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्यामुळेच त्याला मोबाइल टॉवर हे टोपण नाव देण्यात आले होते.