बालाकोटचं भूत! पाकिस्तानला एअर स्ट्राईकची भीती; अमेरिकेकडून गुपचूप सुरूय मोठी खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 19:04 IST2022-04-27T18:50:23+5:302022-04-27T19:04:49+5:30
बालाकोट एअर स्ट्राईकला तीन वर्षे उलटली; पण अजूनही धसका कायम

बालाकोटचं भूत! पाकिस्तानला एअर स्ट्राईकची भीती; अमेरिकेकडून गुपचूप सुरूय मोठी खरेदी
नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलानं बालाकोटवर एअर स्ट्राईक केला. या हल्ल्याची आठवण अद्यापही पाकिस्तानच्या मनात आहे. भारतीय हवाई दलानं २५ फेब्रुवारी २०१९ रोजी बालाकोटवर हवाई हल्ले केले. त्या हल्ल्यातून पाकिस्तान अजूनही सावरलेला नाही. त्यामुळे आता पाकिस्ताननं हवाई हल्ले रोखण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
संबंध बिघडलेले असतानाही पाकिस्ताननं अमेरिकेकडून मल्टिरोल रडार सिस्टिम TPS-77 खरेदी करण्यासाठी करार केला आहे. या कराराच्या अंतर्गत १३ मल्टिरोल रडार खरेदी करण्यात येणार आहेत. त्यातील ८ रडार पाकिस्तानात पोहोचले आहेत. भारतीय विमानं ट्रॅक करण्यासाठी रडार तैनात करण्यात आली आहेत. हवाई सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी पाकिस्ताननं चीनकडूनही रडार मागितले आहेत.
अमेरिकेकडून पाकिस्ताननं १३ रडार सिस्टिम खरेदी केल्या. त्यातले ८ रडार पाकिस्तानात पोहोचले. पैकी ७ रडार कार्यरत करण्यात आले आहेत. पीओकेमधील देओसई, मीरपूरच्या मंगला, करतारपूरमधील पसरूर, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चुनियान, कराचीजवळील भोलारी, बदिन आणि पानो अकिलमध्ये रडार तैनात करण्यात आले आहेत. तर आठवं रडार बहावलपूरमध्ये तैनात करण्याची तयारी सुरू आहे.
अमेरिकेकडून पाकिस्तानला आणखी ५ रडार मिळणार आहेत. ते रडार कुठे तैनात करायचे याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यातील एक रडार खैबर पख्तूनख्वातील नौशेरा जिल्ह्यामधील चेरतमध्ये तैनात करण्यात येईल. विशेष म्हणजे सर्व रडार यंत्रणा पीओके आणि भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. भारताची लढाऊ विमानं ट्रॅक करण्यासाठी पाकिस्ताननं ही तयारी केली आहे.