PM मोदींच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी पाकिस्तानचे 'नापाक' कृत्य; सीमेवर केला गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 10:00 PM2024-02-14T22:00:53+5:302024-02-14T22:02:02+5:30
Pakistan Ceasefire Violation: पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जात आहेत.
Pakistan Ceasefire Violation: भारताचा शेजारील देश पाकिस्तानने पुन्हा एकदा 'नापाक' कृत्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तान रेंजर्सनी बुधवारी (14 फेब्रुवारी 2024) जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौकीवर गोळीबार केला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यानंतर मकवाल येथील सीमा चौकीवर तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांदेखील सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. सायंकाळी 5.50 वाजता सुरू झालेला हा गोळीबार 20 मिनिटांपेक्षा जास्त काळ सुरू होता. सुदैवाने भारताच्या बाजूने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Pakistan Rangers violated ceasefire by resorting to unprovoked firing on BSF post along International Border in Jammu
— Press Trust of India (@PTI_News) February 14, 2024
यापूर्वीही गोळीबार झाला होता
गेल्या वर्षी 8-9 नोव्हेंबरच्या मध्यरात्री सांबा जिल्ह्यातील रामगढ सेक्टरमध्ये पाकिस्तान रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता. 25 फेब्रुवारी 2021 रोजी दोन्ही देशांनी नव्याने युद्धविरामावर सहमती दर्शविल्यानंतर मृत्यूची ही पहिलीच घटना होती. 26 ऑक्टोबर रोजी जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये सीमापार गोळीबारात दोन बीएसएफ जवान आणि एक महिला जखमी झाली होती, तर 17 ऑक्टोबरला अशाच एका घटनेत आणखी एक बीएसएफ जवान जखमी झाला होता.
सुरक्षा कर्मचारी हाय अलर्टवर
अधिकाऱ्यांनी सांगितले की, वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना हाय अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे. 20 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जम्मू-कश्मीर दौरा आहे. अशा परिस्थितीत शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याची घटना समोर आल्यामुळे प्रशासनही अलर्टवर आहे.