Pakistan: पाकिस्तानात बैसाखीमध्ये खालिस्तानसाठी नारेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 09:03 AM2023-04-16T09:03:34+5:302023-04-16T09:05:48+5:30
Khalistan : पाकिस्तानातील प्रसिद्ध श्री पंजासाहिब गुरुद्वारातील बैसाखी उत्सवात खलिस्तानच्या समर्थनार्थ नारेबाजी करण्यात आली. पाकिस्तानात आश्रयास असलेला दहशतवादी गोपालसिंह चावला याने शिखांसाठी स्वतंत्र देशाची मागणी भारतातील शीख भाविकांसमोर केली.
अमृतसर : पाकिस्तानातील प्रसिद्ध श्री पंजासाहिब गुरुद्वारातील बैसाखी उत्सवात खलिस्तानच्या समर्थनार्थ नारेबाजी करण्यात आली. पाकिस्तानात आश्रयास असलेला दहशतवादी गोपालसिंह चावला याने शिखांसाठी स्वतंत्र देशाची मागणी भारतातील शीख भाविकांसमोर केली.
भारतातील सुमारे २ हजार भाविकांचा जथा मागील सप्ताहापासून पाकिस्तानात आहे. काही दिवस नानकानासाहिब येथे थांबल्यानंतर हा जथा हसनअब्दालस्थित श्री पंजासाहिबमध्ये आला. बैसाखीनिमित्त येथे पाकिस्तान शिख गुरुद्वारा प्रबंधक समिती आणि इव्हॅक्युई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड (ईटीपीबी) यांच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खलिस्तानी समर्थक दहशतवादी गोपाल सिंह चावला सहभागी झाला होता.
गोपाल सिंह चावला याने शिख धर्मीयांसाठी स्वतंत्र देशाची मागणी यावेळी भारतीय भाविकांसमोर ठेवली. त्याने म्हटले की, निशानसाहिब झुलतात, प्रत्येकाला इच्छा होत नाही? सर्वांना होते, चला मजबूर आहोत. आम्ही शिरोमणी कमिटीत आहोत, तरीही शीख आहोत. आम्ही दिल्ली कमिटीमध्ये आहोत, तरीही शीख आहोत. आम्ही खुलेपणाने आवाज उठवू शकत नाही. तरीही शीख आहोत. आम्हाला मनापासून वाटते की, आमचाही देश असावा.’ या वक्तव्यानंतर चावलाने ‘खलिस्तान जिंदाबाद’ असे नारे दिले.