दिल्लीतल्या प्रदूषणाला चीन, पाकिस्तान जबाबदार; भाजपा नेत्याचा 'हवाई'शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 09:45 AM2019-11-06T09:45:40+5:302019-11-06T09:51:30+5:30
शेजारच्या देशानं विषारी वायू सोडल्यानं दिल्लीत प्रदूषण; भाजपा नेत्याचं अजब तर्कट
नवी दिल्ली: दिवाळीनंतर दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची तीव्रता सतत वाढत आहे. दृश्यमानता कमी झाल्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. याशिवाय दिल्लीकरांचा श्वासदेखील कोंडला जात आहे. पंजाब, हरयाणातले शेतकरी तण जाळत असल्यानं दिल्लीतली हवा प्रदूषित होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं या दोन्ही राज्यांमधील सरकारची चांगलीच कानउघाडणी केली. मात्र भाजपा नेत्यानं हवेच्या प्रदूषणासाठी पाकिस्तान आणि चीनला जबाबदार धरलं आहे.
आपल्या देशाला घाबरणाऱ्या शेजारी देशानं विषारी वायू सोडला असावा. त्यामुळे हवा प्रदूषित झाली असावी. पाकिस्तान आणि चीन आपल्याला घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांनी विषारी वायू सोडला असावा, असं भाजपा नेते विनीत अग्रवाल यांनी म्हटलं. भाजपाच्या व्यापार विभागाचे संयोजक असलेल्या अग्रवाल यांनी आधीही अनेकदा अशी विधानं केली आहेत. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेला पाकिस्तानच दिल्लीतल्या प्रदूषणासाठी जबाबदार असल्याचं अग्रवाल म्हणाले.
#WATCH Meerut: BJP leader Vineet Agarwal Sharda speaks on pollution issue. Says "...Ye jo zehreeli hawa aa rahi hai, zehreeli gas aayi hai ho sakta hai kisi bagal ke mulk ne chhodi ho jo humse ghabraya hua hai. Mujhe lagta hai Pakistan ya China humse ghabraye huye hain..." (5.11) pic.twitter.com/Ajnw5d7jXU
— ANI UP (@ANINewsUP) November 5, 2019
पाकिस्तानचा शेवट जवळ आला आहे. तो देश भीक मागण्यासाठी कटोरा घेऊन जगभर फिरतोय. भारताचं नुकसान व्हावं यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी आधीदेखील तण जाळायचे. उद्योगधंदे आधीपासूनच सुरू आहेत. मात्र तेव्हा कधीही अशी धुरक्याची चादर पाहायला मिळाली नव्हती. त्यामुळे प्रदूषणासाठी शेतकरी आणि उद्योगधंदे चालवणाऱ्यांना जबाबदार धरणं चुकीचं आहे. देशाच्या विकासात शेतकरी आणि उद्योगपतींचं मोठं योगदान आगे. हे दोन्ही घटक अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, असं अग्रवाल यांनी म्हटलं.