भारत 16 ते 20 एप्रिल दरम्यान हल्ला करेल; पाकिस्तानला सतावतेय भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 10:55 PM2019-04-07T22:55:33+5:302019-04-07T22:57:03+5:30
गुप्तहेर खात्याकडून मिळालेल्या माहितीचा संदर्भ देत पाकिस्तानचा दावा
कराची: भारत पुन्हा एकदा हल्ला करेल, अशी भीती पाकिस्तानला सतावते आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी हल्ल्याची भीती बोलून दाखवली. 16 ते 20 एप्रिल दरम्यान भारताकडून हल्ला केला जाईल, असा दावा कुरेशी यांनी केला. यावेळी त्यांनी गुप्तहेर खात्याकडून मिळालेल्या माहितीचा संदर्भ दिला. भारतानं पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर एअर स्ट्राइक केला. तसाच हल्ला पुन्हा केला जाईल, अशी भीती कुरेशी यांनी व्यक्त केली.
भारताकडून आणखी एका हल्ल्याची तयारी केली जात असल्याची विश्वसनीय माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे, असं कुरेशी यांनी पत्रकारांना सांगितलं. 16 ते 20 एप्रिल दरम्यान भारत पुन्हा एकदा हल्ला करेल, असंही ते पुढे म्हणाले. याबद्दलची अधिक माहिती पंतप्रधान इम्रान खान देशाला देण्यास तयार आहेत, असं कुरेशी यांनी सांगितलं. आम्ही याबद्दल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला मेल केला. मात्र त्यांच्याकडून कोणतंही उत्तर आलं नाही, असं ते म्हणाले.
भारतीय हवाई दलानं 26 फेब्रुवारीला धडाकेबाज कारवाई करत बालाकोटवर बॉम्ब टाकले. या एअर स्ट्राइकमध्ये जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्याचा मोठा धसका पाकिस्ताननं घेतला. हल्ल्याला जवळपास दीड महिना उलटूनही पाकिस्ताननं हवाई मार्ग पूर्णपणे खुला केलेला नाही. एअर स्ट्राइकनंतर पाकिस्ताननं तातडीनं हवाई मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. अद्यापही पाकिस्तानच्या हवाई हद्दीतील वाहतूक पूर्णपणे सुरू झालेली नाही. दोनच दिवसांपूर्वी पाकिस्ताननं पाश्चिमात्य देशांकडे जाणारा एक हवाई मार्ग सुरू केला. मात्र अजूनही पाकिस्ताननं दहा मार्ग बंदच ठेवले आहेत.