फुटीरवादी अमृतपाल सिंगच्या साथीदाराचे पाकिस्तान कनेक्शन; नवे धागेदोरे लागले हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 09:16 AM2023-03-29T09:16:04+5:302023-03-29T09:17:45+5:30
कलसीच्या दुबईतील मुक्कामाची व्यवस्था खलिस्तानी दहशतवादी लांडा हरिके याने केली होती.
नवी दिल्ली : फुटीरवादी अमृतपाल सिंग याचा शोध सुरू असतानाच गुप्तचर यंत्रणांनी त्याच्या पाकिस्तानसोबतच्या संबंधाचे नवे धागेदोरे हाती लागल्याचा दावा केला आहे. अमृतपालचा वित्त पुरवठादार दलजीत कलसी हा पाकचे माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवांच्या मुलाचा निकटवर्तीय असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कलसी दोन महिन्यांसाठी दुबईला गेल्याचे समजते. कलसीच्या दुबईतील मुक्कामाची व्यवस्था खलिस्तानी दहशतवादी लांडा हरिके याने केली होती.
सरकारला अल्टिमेटम
फुटीरवादी अमृतपाल सिंग व त्याच्या साथीदारांविरुद्धच्या कारवाईदरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व तरुणांची सुटका करण्यासाठी अकाल तख्तचे जत्थेदार ग्यानी हरप्रीत सिंग यांनी सोमवारी राज्य सरकारला २४ तासांची मुदत दिली.
बीबीसी पंजाबी न्यूजचे ट्विटर अकाउंट निलंबित
अमृतपाल सिंग याच्याविरुद्धच्या मोहिमेदरम्यान बीबीसी पंजाबी न्यूजचे ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आले आहे. ट्विटर हँडलवरील संदेशात म्हटले आहे की, कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून हे खाते हटविण्यात आले आहे. मात्र, हे अकाउंट नेमके कशामुळे निलंबित करण्यात आले हे अद्याप समजू शकलेले नाही.