पाकिस्तानचा क्रिकेट संघ शनिवारी भारतात येणार
By admin | Published: March 11, 2016 06:07 PM2016-03-11T18:07:49+5:302016-03-11T18:13:03+5:30
सुरक्षेच्या मुद्यावरुन विनाकारण राजकारण करणा-या पाकिस्तान सरकारने अखेर पाकिस्तानी क्रिकेट संघाला भारतात पाठवण्यास मंजुरी दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - सुरक्षेच्या मुद्यावरुन विनाकारण राजकारण करणा-या पाकिस्तान सरकारने अखेर पाकिस्तानी क्रिकेट संघाला भारतात पाठवण्यास मंजुरी दिली आहे. भारतात होणा-या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानी संघ शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी दुबईमार्गे भारतात दाखल होऊ शकतो.
पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री चौधरी निसार अली खान यांनी पाकिस्तानी संघाला भारतात खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. निसार अली खान यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पीसीबीचे पदाधिकारी नजाम सेठी यांनी पाकिस्तानी संघ भारतात जाणार असल्याचे जाहीर केले.
पाकिस्तानने धरमशाळा येथे होणा-या सामन्याच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर सामन्याचे स्थळ बदलून कोलकात्याला हलवण्यात आले. मात्र त्यानंतरही पाकिस्तानला सुरक्षेचे लिखित आश्वासन हवे होते.
शुक्रवारी केंद्रीय गृहसचिव राजीव मेहर्षी यांनी पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी संपूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिल्यानंतर चक्रे फिरली आणि पाकिस्तानी संघाला भारतात येण्यासाठी परवानगी मिळाली.