हाय अलर्ट ! प्रजासत्ताक दिनापूर्वी सीमारेषेवर मोठा हल्ला घडवण्याचा पाकिस्तानचा कट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 04:52 PM2019-01-24T16:52:28+5:302019-01-24T17:02:53+5:30
Jammu kashmir : काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र स्वरुपात राबवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जवानांच्या कारवाईमुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं सीमारेषेवर स्नायपर्स आणि बॉर्डर अॅक्शन टीम तैनात केल्याची माहिती समोर आली आहे.
श्रीनगर - काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र स्वरुपात राबवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जवानांच्या कारवाईमुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं सीमारेषेवर स्नायपर्स आणि बॉर्डर अॅक्शन टीम तैनात केल्याची माहिती समोर आली आहे. सीमारेषेवर दहशतवाद्यांनी अनेक तळ उभारल्याची माहिती सॅटलाइटद्वारे मिळालेल्या चित्रांद्वारे स्पष्ट झाली आहे. 26 जानेवारीपूर्वी पाकिस्तानी स्नायपर्स आणि बॉर्ड अॅक्शन टीम भारतीय जवानांवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून भारतीय लष्करानं कठोर मोहीम राबवत दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामुळे पाकिस्तान सैरभैर झाला आहे. भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करण्याचा कट पाकिस्तानात रचला जात आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, मोहम्मद अशरफच्या मदतीनं पाकिस्तान भारतीय जवानांवर हल्ला करण्याचा कटकारस्थान रचत आहे. मोहम्मद सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये वास्तव्यास आहे. त्याच्या मदतीनं पाकिस्तानला तंगधार परिसरात मोठा हल्ला घडवायचा आहे. भारतीय जवानांच्या प्रमुख चौक्यांवर पाकिस्तानचे लक्ष्य आहे. सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवान सतर्क झाले आहेत.
दरम्यान, सीमारेषेपलिकडून वारंवार भ्याड हल्ला करणाऱ्यांचं कंबरडं मोडण्यासाठी भारतीय लष्करानं मोहीम हाती घेतली आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम लष्कराने अधिकच तीव्र केल्याचं दिसत आहे. भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई राबवत कधी काळी हिज्बुलचा गड मानल्या जाणाऱ्या काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्याला दहशवादमुक्त केले आहे. दहशतवादाविरोधातील भारतीय लष्कराच्या मोहीमेला मिळालेले हे मोठे यश आहे.
जवानांच्या यशस्वी कारवाईनंतर बारामुल्ला जिल्हा दहशवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. दहशतवादमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेल्या उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला हा पहिलाच जिल्हा असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी (23 जानेवारी) बारामुल्लामध्ये तीन दहशवाद्यांना यमसदनी धाडल्यानंतर भारतीय लष्कराकडून या जिल्ह्याला दहशतवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले.