डबघाईला आलेल्या पाकिस्तानला नडतोय काश्मीरचा हव्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 09:48 AM2018-08-28T09:48:06+5:302018-08-28T10:52:05+5:30
पृथ्वीवरील स्वर्ग समजले जाणाऱ्या काश्मीरवर सुरुवातीपासूनच पाकिस्तानची वाकडी नजर आहे. पण काश्मीरच्या हव्यासामुळे पाकिस्तानचे...
नवी दिल्ली - पृथ्वीवरील स्वर्ग समजले जाणाऱ्या काश्मीरवर सुरुवातीपासूनच पाकिस्तानची वाकडी नजर आहे. पण काश्मीरच्या हव्यासामुळे पाकिस्तानचे चौफेर नुकसान होत असल्याचे मत पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणाची सखोर माहिती असलेल्या भारताच्या गुप्तवार्ता विभागातील एका माजी अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. काश्मीरबाबत पाकिस्तानच्या मनात असलेल्या हावेमुळेच पाकिस्तानमध्ये लष्कर सर्वोच्च शक्तीकेंद्र बनली आहे. तसेच काश्मीरच्या हव्यासातूनच पाकिस्तानमध्ये दहशतवादाचा उदय झाला असून, तेथील लोकशाही धोक्यात आली आहे, असे मत या अधिकाऱ्याने मांडले आहे.
भारताची गुप्तहेर संघटना असलेल्या रॉ मध्ये विशेष सचिव म्हणून काम पाहिलेल्या ज्योती के. सिन्हा यांनी इंडियन डिफेन्स रिव्ह्यूमध्ये आपले मत मांडले आहे. " मोहम्मद अली जिन्ना यांचा झालेला आकस्मिक मृत्यू आणि पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या हत्येनंतर पाकिस्तानमध्ये अराजकाची सुरुवात झाली. जिन्ना आणि खान यांनी पाकिस्तानला लोकशाहीची दिशा दिली होती. मात्र लवकरच लष्कर पाकिस्तानमध्ये प्रबळ झाले. तसेच काश्मीर प्रश्न हा पाकिस्तानसाठी प्रतिष्ठेचा बनला. काश्मीरबाबतच्या कारवायांमुळेच पाकिस्तानात लष्कर प्रभावी आणि शक्तिशाली बनले. पुढे पाकिस्तान हा देशाकडे लष्कर नव्हे तर लष्कराकडे असलेला देश बनला."
पश्चिम पाकिस्तानातील पंजाबी आणि पूर्व पाकिस्तानातील बंगाली यांच्या वादातून बांगलादेशचा जन्म झाला. आज बांगलादेश हा पाकिस्तानपेक्षा कैकपटीने पुढे गेला आहे. बांगालदेशमध्ये लोकशाही स्थिरस्थावर झाली आहे. तसेच तेथील लष्करही लोकनियुक्त सरकारच्या आदेशाबरहुकूम काम करते. मात्र पाकिस्तानचे भवितव्य अनिश्चित आहे. फाळणीनंतर काश्मीर आपल्या ताब्यात घेण्याचे पाकिस्तानचे मनसुबे पूर्ण होऊ शकलेले नाही. काहीही करून काश्मीर आपल्या ताब्यात घेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. त्यामुळे भूतकाळातील घटनांमधून पाकिस्तानने धडा न घेतल्यास पाकिस्तानचे पुन्हा एकदा विभाजन अटळ आहे.