भारताच्या राष्ट्रपतींना आमच्या हवाई हद्दीतून जाऊ देणार नाही- पाकिस्तान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 17:02 IST2019-09-07T17:02:38+5:302019-09-07T17:02:41+5:30
राष्ट्रपती रामनाथ कोविंद लवकरच आईसलँडच्या दौऱ्यावर

भारताच्या राष्ट्रपतींना आमच्या हवाई हद्दीतून जाऊ देणार नाही- पाकिस्तान
इस्लामाबाद: भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आमच्या हवाई हद्दीतून जाऊ देणार नाही, अशी भूमिका पाकिस्ताननं घेतली आहे. रामनाथ कोविंद आईसलँडच्या दौऱ्यासाठी जाणार आहेत. मात्र त्यांच्यासाठी एअरस्पेस उघडणार नाही, अशी भूमिका पाकिस्ताननं घेतली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी याबद्दलची माहिती दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद 17 सप्टेंबरपासून आईसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.
भारताचे राष्ट्रपती आईसलँडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाता यावं, यासाठी भारताकडून परवानगी मागण्यात आली होती. मात्र पाकिस्ताननं कोविंद यांना परवानगी नाकारली, अशी माहिती कुरेशींनी सरकारी वृत्तवाहिनी असलेल्या पीटीव्हीला दिली. पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
फेब्रुवारीत भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राइक केला होता. पाकिस्तानच्या हद्दीतील जैश-ए-मोहम्मदच्या सर्वात मोठ्या दहशतवादी तळांवर हवाई दलानं हल्ला चढवला होता. त्यानंतर पाकिस्ताननं एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला. मार्चमध्ये हे निर्बंध काहीसे शिथिल केले होते. मात्र भारतासाठी निर्बंध कायम ठेवण्यात आले. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांचं काही प्रमाणात नुकसान झालं.